Wed, May 27, 2020 17:52होमपेज › Goa › गोव्यात राजकीय भूकंपाची शक्यता नाहीच : मंत्री राणे

गोव्यात राजकीय भूकंपाची शक्यता नाहीच : मंत्री राणे

Last Updated: Dec 04 2019 1:06AM
पणजी : प्रतिनिधी
गोव्यात कोणताही राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाही. शिवसेनेला राज्यात कोणीही मान देत नसून त्यांचा एकही लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाही. शिवसेनेबरोबर युती करणे म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखे आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मिरामार येथील आपल्या खासगी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

राणे म्हणाले की, शिवसेनेचे महाराष्ट्रातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी गोव्यात लवकरच विरोधकांची आघाडी उघडणार असल्याचे सांगितले असून हा त्यांचा भ्रम आहे. शिवसेनेला संपूर्ण गोव्यात कोणीही मान देत नाही. जे सरकारात नाही, तेच आमदार विरोधी आघाडी करण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. राऊत यांनी गोव्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगितले असले तरी त्यांनी सहा महिने  वाट पाहिल्यास महाराष्ट्रातच राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे त्यांना दिसून येईल. 

राणे म्हणाले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 27 आमदार एकसंध असून ते आता फुटण्याची शक्यता नाही. कोणालाही शिवसेनेसारख्या तृतीय दर्जाच्या पक्षाशी युती करण्याची इच्छा नाही. तलवार उपसणार्‍या राजकीय पक्षांना गोमंतकीय थारा देणार नाहीत. ज्यांना शिवसेना गोव्यात यायला हवी आहे ते संपून जातील. राऊत यांनी गोव्यात विकासासाठी अविरत वावरणारे सावंत यांचे सरकार पाडण्याचे काम करू नये. खाणबंदीमुळे राज्यात अनेक प्रश्‍न निर्माण झाले असले तरी केंद्र सरकारच्या मदतीने या संकटांवर लवकरच मात केली जाणार आहे.

म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास
म्हादईचा प्रश्‍न व्यवस्थित आणि नियोजनबद्धरीत्या सोडविण्यासाठी आपण आणि पर्येचे आमदार तथा आपले वडील प्रतापसिंह राणे एकत्र आहोत. प्रतापसिंह राणे सुमारे 50 वर्षे राजकारणात असून म्हादईबाबत त्यांच्यापेक्षा जाणकार व्यक्‍ती राज्यात दुसरी नाही. ज्यांनी जन्मात म्हादई पाहिली नाही त्यांनी म्हादईच्या नावाने राजकारण करू नये. म्हादईचा विषय राज्याच्या हिताच्या द‍ृष्टीने सोडवला जाणार असून याविषयी आपला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्र सरकारवर विश्‍वास असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले.