होमपेज › Goa › ‘पर्यायी व्यवस्थेची गरजच नाही’

‘पर्यायी व्यवस्थेची गरजच नाही’

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 1:05AMपणजी ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे प्रशासकीय कारभार सांभाळण्यात सक्षम  आहेत. ते सरकारी फाईलीवर अभ्यास करू शकतात. तसेच ते फक्‍त आठ दिवसात परत येणार असल्याने मुख्यमंत्रिपदाची पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

मुंबईला पर्रीकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी बुधवारी भेट घेतली. त्यावेळी पर्रीकर यांनी पर्यायी व्यवस्थेची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ठामपणे सांगून याआधी प्रमाणेच अमेरिकेतून प्रशासकीय कारभार हाकणार असल्याचे सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी  तात्पुरती व्यवस्था करण्यासंबंधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी गुरुवारी  (आज)चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले होते.   प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद तानावडे यांच्यासह शहा यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले होते. 

गोव्यात सोशल मीडियावर पर्रीकरांच्या अनुपस्थितीमुळे नेतृत्वाची समस्या उद्भवल्याची चर्चा सुरू होती.त्यासंबंधी पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्रीपाद नाईक यांनी पर्यायी व्यवस्थेविषयी निर्णय झाला नसल्याचे सांगितले.  मात्र पर्यायी व्यवस्थेची गरज असल्याचे आपलेही मत असून पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास कोणतीही जबाबदारी घेण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.