Thu, Jul 02, 2020 15:43होमपेज › Goa › कला अकादमीची वास्तू पाडण्याची गरज नाही 

कला अकादमीची वास्तू पाडण्याची गरज नाही 

Published On: Sep 19 2019 1:29AM | Last Updated: Sep 19 2019 1:29AM
पणजी : प्रतिनिधी
पणजीतील कला अकादमीची वास्तू पाडण्याची गरज नाही. मात्र  या  इमारतीत तातडीने  काही दुरुस्त्या करणे आवश्यक असल्याचे गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या सल्लागार ‘मे. जेम इंजसर्व्ह कं.’ने तयार केलेल्या अहवालात  म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.     

कला अकादमीच्या संकुलाच्या बांधकामाबाबत सद्यस्थिती समजण्यासाठी या अगोदर कला व संस्कृती खात्याने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (जीईसी)अहवाल मागितला होता.‘जीईसी’ ने  दिलेल्या 300 पानी अहवालात ब़र्‍याच  सूचना केल्या होत्या. आता ‘जीएसआयडीसी’ने नेमलेल्या सल्लागार ‘मे. जेम इंजसर्व्ह कं.’ने सरकारला अहवाल सादर केला असून   कला अकादमी संकुलाचे  केलेले सखोल परिक्षण या अहवालात मांडले आहे. अकादमीच्या कोणत्या भागात दुरूस्तीची गरज आहे, कोणते खांब कमकुवत झाले आहेत ,याची तपशीलवार माहिती अहवालात देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कला अकादमीची दर पाच वर्षांनी आवश्यक असलेल्या दुरुस्ती वा देखभालीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच या संकुलाची दयनीय अवस्था झाली आहे. दरवर्षी ‘इफ्फी’च्या वेळी संकुलाची वरवर दुरूस्ती आणि रंगरंगोटी करून ‘मेकअप’ केला जात होता. अकादमीचे ‘ स्ट्रक्चरल ऑडिट ’ आजपर्यंत करण्यात आले नसल्यानेच संकुलातील खरे दुखणे कधीही जाणवले नव्हते. ताज्या अहवालात कला अकादमीचे खुले थिएटरदेखील पाडण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. मात्र त्याचबरोबर गंभीर स्वरुपाची दुरुस्ती अर्थात ‘रेट्रोफिटींग’ करण्याची म्हणजेच काही भागात नव्याने लोखंडी सळया बसविण्याची गरज व्यक्त केली आहे. तथापि हा प्रकल्प पाडण्याची मुळीच आवश्यकता नाही, अशा आशयाचा अहवाल सरकारला सादर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नव्या अहवालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. हा एवढा मोठा प्रकल्प पाडला असता तर नव्याने अशा पद्धतीचा प्रकल्प उभारण्यास कोट्यवधींचा खर्च येण्याची शक्यता होती. त्याऐवजी हेच काम आता रु. 50 कोटींच्याही आत होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

सर्वांना विश्‍वासात घेऊनच निर्णय : गावडे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याला अहवाल पोहोचवला असून त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की आपण राज्यातील कलाकार, प्रेक्षक, पर्यावरणप्रेमी, रसिक, पत्रकार व अकादमीसंबंधित सर्व घटकांना विश्‍वासात घेऊनच पुढील निर्णय घेणार आहे.