Mon, May 25, 2020 11:07होमपेज › Goa › गाेवा : राज्य मंत्रिमंडळात बदलाची गरज नाही

गाेवा : राज्य मंत्रिमंडळात बदलाची गरज नाही

Published On: Oct 18 2018 1:44AM | Last Updated: Oct 20 2018 1:44AMपणजी : प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळात आणखी बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही. मंत्रिमंडळात दोन जुन्या मंत्र्यांच्या जागी  नवे मंत्री नेमण्यात आले असून, आता काहीही बदल करण्याची गरज नाही. मंत्र्यांची संख्या पूर्ण झालेली आहे, असे  भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले. 

भाजपच्या येथील मुख्यालयात भाजपच्या कोअर टीमची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तेंडुलकर म्हणाले की, राज्यात  नेतृत्वबदल होण्याची आता कोणतीही शक्यता नाही. भाजप पक्ष बलवान करण्यासाठी आम्ही वावरत असून, पोटनिवडणुकीत तिकीट वाटपाविषयी निर्णय योग्य वेळीच घेणार आहे. 

भाजपच्या बुधवारी झालेल्या कोअर गटाच्या बैठकीत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर, दयानंद मांद्रेकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, दामू नाईक, खजिनदार संजीव देसाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक वादळी झाल्याची चर्चा पत्रकारांमध्ये होत असल्याने त्याविषयी विचारले असता तसे काही नसल्याचे सांगून तेंडूलकर यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. 
तेंडूलकर म्हणाले, की भाजपच्या कोअर गटाच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा करण्यात आली नव्हती. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी येत्या 25 ऑक्टोबर रोजी सर्व मतदारसंघाचे भाजप गटाध्यक्ष आणि सरचिटणीस यांना बोलावण्यात येणार आहे.यासंबंधी जबाबदारी वाटून घेण्यात आली.  

भाजपचे काँग्रेसीकरण झाल्याची टीका होत असली तरी असा कसलाही प्रकार झालेला नाही. ‘सब का साथ, सब का विकास’ आणि ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे भाजपचे  घोषवाक्य असून त्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. येणार्‍या लोकसभा निवडणूकीत केंद्रात  पुन्हा  सरकार स्थापन करण्याचे  भाजपचे स्वप्न असून ते पूर्ण करणारच, असे तेंडूलकर यांनी सांगितले. तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेस पक्ष सोडून आलेल्या सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांना आमच्या पक्षाने एकही पैसा दिलेला नाही. त्यांच्यासाठी पक्षाने एक देखील पैसा खर्च केला नाही. त्यांच्या विमानाचे तिकीटही त्यांनीच काढले व त्यांच्यासाठी हॉटेलची खोली आरक्षित देखील त्यांनी स्वत:च केली असून भाजपाने काहीही खर्च केलेला नाही. खाण मालकांनी काँग्रेस आमदारांना फुटण्यासाठी  पैसा दिला, असा होणारा प्रचार चुकीचा  आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची तब्येत सुधारत असून ते कुटुंबियांसमवेत गप्पागोष्टी करत आहेत. भाजपमध्ये दाखल झालेल्या ामजी आमदारांनी बुधवारी पर्रीकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. आपणही त्यांना मंगळवारी भेटलो असून राज्यातील राजकीय स्थितीबद्दल त्यांना कल्पना दिलेली आहे. पर्रीकर यांनी दिवाळीपर्यंत विश्रांती घेण्याची आवश्यकता असून नंतरच ते पूर्ववत कामाला लागण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस आमदार घटक पक्षात जाणे शक्य 

काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजप घटक पक्षांमध्ये जाण्याची शक्यता आहे. जर त्यांना भाजपचे तत्त्व मान्य असेल तर ते आमच्यात येऊ शकतात. अथवा ते गोवा फॉरवर्ड किंवा मगो पक्षांमध्येही जाऊ शकतात. मात्र, नेमके कोण पक्ष बदल करणार ते आधी जगजाहीर करून येत नाहीत.असली माहिती आधी कोणी उघड करतो का?. जर कोणी पक्ष बदल करणार असेल तर  ते सांगून थोडेच येणार आहेत. आपणही त्यांची माहिती उघड करू शकत नाही, असे तेंडुलकर यांनी सांगितले.