Tue, May 26, 2020 04:59होमपेज › Goa › शेल्डे येथे महिलेला सापडली बेवारस बंदूक

शेल्डे येथे महिलेला सापडली बेवारस बंदूक

Last Updated: Dec 02 2019 1:46AM

संग्रहीत छायाचित्रमडगाव : प्रतिनिधी
घणेमरड शेल्डे येथे मुख्य रस्त्यानजीक असलेल्या शेताजवळ सिमेंटच्या पिशवीत स्थानिक शेतकरी महिलेला बेवारस बंदूक आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केपे पोलिसांनी सदर बंदूक ताब्यात घेतली असून सदर बंदुकीचे भाग वेगवेगळे करण्यात आल्याने शेल्डे भागात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सविस्तर माहितीनुसार, घणेमरड येथे मुख्य रस्त्याजवळ असलेल्या शेतात जाताना दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. सदर बंदूक रस्त्याच्या कडेला एका सिमेंटच्या पिशवीत बांधून टाकण्यात आली होती. स्थानिक शेतकरी महिला या रस्त्याने शेतात जात असताना तिला पिशवीत काहीतरी असल्याचे दिसून आले. तिने पिशवी उघडली असता त्यात तिला एक बंदूक आढळून आली. तिने घाबरून ती पिशवी तशीच बाजूला  टाकली पण तिच्या घरच्यांनी तिला या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यास सांगितल्यानंतर त्यांनी केपे पोलिसांना या घटनेची माहिती दिली.केपे पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा करून सदर बंदूक ताब्यात घेतली आहे.

केपे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांना विचारले असता, ते म्हणाले की, सदर बंदूक मोडलेल्या अवस्थेत आहे. बंदूक कोणत्या स्वरूपाची आहे या विषयी अजून कळालेले नाही. सिमेंटच्या बॅगमध्ये सापडलेल्या बंदुकीची बोअर, नळी आदी भाग वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. सदर बंदूक एअर गन सुद्धा असू शकते. पण ती मोडून रस्त्याच्या शेजारी टाकण्यात आल्याने हा चौकशीचा विषय बनलेला आहे.सध्या ती बंदूक ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शेल्डे परिसरात शेती, बागायती आहेत. त्याशिवाय अनेक शेतकरी ऊस लागवड करतात. रानडुकरांकडून अनेकदा उसाची नासधूस  केली जाते. त्यासाठी लोक बंदुकीचा वापर करतात. त्याशिवाय रानडुकरांच्या शिकारीसाठीसुद्धा बंदुकीचा वापर केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ही बेवारस बंदूक सापडल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.