Wed, Jul 08, 2020 12:54होमपेज › Goa › पाणी सुरू, पुरवठा विस्कळीत 

पाणी सुरू, पुरवठा विस्कळीत 

Published On: Aug 23 2019 1:29AM | Last Updated: Aug 24 2019 1:27AM
पणजी : प्रतिनिधी

केरये-खांडेपार येथे तुटलेल्या जलवाहिन्यांचे काम संपल्याने अखेर पणजीसह तिसवाडी भागाला तब्बल आठव्या दिवशी, गुरुवारी सकाळी नळातून पाणी आल्याने रहिवाशांंनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र, सदर पाण्याला दाब कमी ठेवण्यात आल्यामुळे पणजी शहरातील अनेक उंचावरील तसेच दुर्गम भागात काहींना पाणी मिळालेच नसल्याचे आढळून आले. यामुळे बहुतांश पणजीकरांना ‘पाणी सुरू, पण पुरवठा विस्कळीत’ अशा विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. कमी दाबाचा हा प्रश्‍न दोन दिवसांनंतर सुटणार असून त्यानंतर स्थिती पूर्ववत होईल, असे बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, ओपाहून बुधवारी संध्याकाळी सोडलेले पाणी पणजी शहरात बुधवारी रात्री 8.30 वाजता पोचले. हे पाणी आल्तिनो, कुडका, जुने गोवे येथील मोठ्या साठवणूक टाक्यांत भरण्यास तीन ते 4 चार तास लागले. सोडलेल्या पाण्याचा दाब समान राहण्यासाठी टाकी पूर्ण भरल्यानंतरच ते गुरूवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले. मात्र, शहरातील जलवाहिनीच्या लांबच्या टोकावरील अथवा उंचावरील घरांना पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळाले नसले तरी हा दाब दोन दिवसांत पूर्ववत होऊन पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. 

शहरात सात दिवस पाणीपुरवठा ठप्प राहिल्याने तहानलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत अनेकांच्या घरात पाणी पोचल्याने रहिवाशांनी व खास करून गृहिणींनी आनंद व्यक्त करून घरातील भांडी व टाक्या भरण्यास सुरुवात केली. मात्र, हा आनंद इमारतीच्या पहिल्या वा दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या अनेकांसाठी अल्पकाळ ठरला. कारण आलेले पाणी घराच्या समोर आले तरी ते तळमजल्यापर्यंतच पोचत होते. त्यावरील मजल्यावर हे पाणी चढत नसल्याने तळमजल्यावरील लोकांनी शेजारधर्म निभावताना आपल्या घरातून अथवा खालच्या टाकीतून पाणी नेण्यास देऊन माणुसकी दाखवल्याचेही दिसून आले. 

750 मि. मी. वाहिनीचे काम पूर्ण

केरये-खांडेपार येथील 750 मि. मी. जलवाहिनी बसवण्याचे काम गुरुवारी पूर्ण करण्यात आले असून या वाहिनीच्या चारी बाजूला काँक्रिटीकरण करण्याचे काम गुरुवारी रात्री संपेल. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कुंभारजुवे, जुने गोवे तसेच फोंडा तालुक्यातील भोम, कुंडई, प्रियोळ, बाणस्तारी, मार्शेल, तिवरे-वरगाव या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूत्रांनी गुरुवारी संध्याकाळी सांगितले.