होमपेज › Goa › बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

Published On: Apr 25 2019 1:43AM | Last Updated: Apr 25 2019 12:16AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा  माध्यमिक  व  उच्च माध्यमिक शिक्षण   मंडळाने  फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेतलेल्या 2018-19 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, 30 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.  सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळाने बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

इयत्ता बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी  ते  27 मार्च या कालावधीत झाली.  वाणिज्य, विज्ञान, कला  व व्यावसायिक शाखेच्या मिळून  एकूण 17 हजार 876  विद्यार्थ्यांनी   ही परीक्षा दिली होती.   9 हजार 308 मुली व 8 हजार 568  मुलांचा यात समावेश होता. कला शाखेतून  4 हजार 331 विद्यार्थ्यांनी, वाणिज्य  शाखेतून  5 हजार 341, विज्ञान शाखेतून  5 हजार 264 व व्यावसायिक   शाखेतून  2 हजार 940 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  2017-18  या  मागील शैक्षणिक वर्षात  बारावीच्या परीक्षेला  18 हजार 499 विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर 85.84 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

बारावी निकाल  30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केल्यानंतर गुणपत्रिकाही त्याच दिवशी सकाळी 11.30  ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत दिल्या जातील. बार्देश, तिसवाडी, डिचोली, पेडणे, सत्तरी, फोंडा व धारबांदोडा येथील विद्यार्थी आपापल्या गुणपत्रिका  पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयातून आणि केपे, काणकोण, सासष्टी, मुरगाव व सांगे येथील विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका मडगाव येथील लॉयला उच्च माध्यमिक विद्यालयातून घ्याव्यात,  असे मंडळाने  कळविले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट  दाखविणे आवश्यक आहे. दरम्यान,  बारावीचा निकाल  गोवा  शिक्षण  मंडळाच्या सलीहीश.र्सेीं.ळप या  संकेतस्थळावरही उपलब्ध होणार आहे.