Fri, May 29, 2020 21:09होमपेज › Goa › व्हीव्हीपॅट स्लिपांच्या मोजणीमुळे विलंबाची शक्यता

निवडणूक निकाल लांबणार? 

Published On: May 10 2019 1:59AM | Last Updated: May 10 2019 1:59AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि विधानसभेच्या एकूण चार मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. आता लोकांचे लक्ष निकालाकडे लागले असून यंदा राज्यातील सुमारे 220 मतदान केंद्रांतील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मतदान स्लिपांची प्रत्यक्ष मोजणी घ्यावी लागणार असल्यामुळे 23 मे रोजी निकाल जाहीर व्हायला संध्याकाळपर्यंत वा रात्री 8 वाजेपर्यंत वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘ईव्हीएम’ यंत्रांवरील संशय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात जारी केलेल्या निर्देशांमुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील मतमोजणी संथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या आदेशात राज्यातील प्रत्येक मतदारसंघाच्या पाच मतदान केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील मतदान स्लिपांची प्रत्यक्ष मोजणी करण्यास सांगितले आहे. या आदेशाचा राज्यातील सहा निवडणुकांच्या मतमोजणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

यासंबंधी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी आर. मेनका यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकार्‍यांना दिलेल्या आदेशामुळे प्रत्येक मतदारसंघाच्या पाच ठिकाणांवरील मतदान केंद्रांतील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांतील मतांच्या स्लिपांशी पडताळणी करणे जरूरी आहे. एका ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रातील स्लिपांची हाताने मोजणी करण्यास किमान एक तास लागण्याची शक्यता आहे. आम्हाला आधी ‘ईव्हीएम’वरील मते मोजावी लागणार आहेत. त्यानंतर पाच निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रांतील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांतील स्लिपांची मोजणी पाठोपाठ करावी लागणार आहे. 

राज्यातील लोकसभेच्या दोन मतदारसंघांतील 20 विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5, तसेच मांद्रे, म्हापसा, शिरोडा आणि पणजी या चार मतदारसंघांच्या प्रत्येकी 5 केंद्रांवरील ‘ईव्हीएम’ यंत्रांतील मते आधी मोजण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी टपाल मतांची मोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार असून ‘ईव्हीएम’वरील मते मोजणीस 8.30 वाजता सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि पोटनिवडणुकीची मतमोजणी एकाचवेळी हाती घेण्यात येणार आहे. 
 
मोजणी संपण्यास विलंबाची शक्यता 

लोकसभेच्या दोन मतदारसंघांतील एकूण 40 विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी 5 मतदान केंद्रांतील मिळून 200 केंद्रांतील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांतील स्लिपांची मोजणी स्वतंत्ररित्या होणार आहे. याशिवाय, चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीतील प्रत्येकी 5 प्रमाणे 20 मतदान केंद्रांतील ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांतील स्लिपांची स्वतंत्रपणे हाताने मोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 23 मे रोजी रात्री 8 वाजण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.