Wed, Jul 08, 2020 13:32होमपेज › Goa › ऐन चतुर्थीत खड्डेमय रस्ते, खंडित विजेमुळे जनता त्रस्त

ऐन चतुर्थीत खड्डेमय रस्ते, खंडित विजेमुळे जनता त्रस्त

Published On: Sep 09 2019 1:30AM | Last Updated: Sep 09 2019 1:30AM
पणजी : प्रतिनिधी
भाजप सरकार जनतेबाबत पूर्णपणे असंवेदनशील असून, ऐन चतुर्थी काळात लोकांना हालअपेष्टा सहन करण्यास भाग पाडले आहे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या गोमंतकीयांना सणासुदीच्या दिवसांत रस्त्यावरील खड्डे, खंडित वीजपुरवठा यामुळे यातना सहन कराव्या लागल्या, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारवर शरसंधान साधले. 

चोडणकर यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोवा सरकारचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतरही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मौन बाळगून आहेत. एकंदर प्रकरणात चौकशीचे आदेश देणेही मुख्यमंत्र्यांनी टाळल्याने त्यांनी भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभाराला मान्यताच दिल्याचे स्पष्ट होते. फातोर्डा स्टेडियमच्या दुरुस्तीकामात झालेला 61 कोटी रुपयांचा घोटाळा, गोवा पर्यटन मेळावा आयोजित करण्यासाठीच्या कंत्राटाचा 4.97 कोटींचा घोटाळा, द‍ृष्टी लाईफ सेव्हिंग यांना किनारे स्वच्छता कंत्राट बेकायदेशीरपणे वाढवून देणे, किनारे सुरक्षेचे कंत्राट बेकायदेशीरपणे द‍ृष्टी कंपनीला देणे तसेच पर्यटन प्रोत्साहनासाठी सहभागी होणार्‍या प्रदर्शनातील घोटाळे समोर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी क्रीडा तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांच्यावर कारवाई केलेली नाही. नगर नियोजन खात्यातील माफियासंबंधी सोशल मीडियात प्रसृत झालेल्या एका पत्रासंबंधीही मुख्यमंत्री गप्प असून, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर 
यांना पाठिशी घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत. 

पावसाळी अधिवेशन संपून एक महिना होत आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत विधानसभेत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. गोव्यातील भाजप सरकारने बेरोजगार युवकांबाबत असंवेदनशीलता दाखवताना, ऐन चतुर्थीत नोकरीचे अर्ज घेण्यासाठी सांगे, काणकोण, पेडण्यापासून बांबोळीपर्यंत खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करत रांगेत ताटकळत उभे राहण्यास भाग पाडले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नोकरीच्या अर्जांसाठी बेरोजगार युवकांना दिलेल्या यातनांबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

गोमंतकीयांना शौचालये न उपलब्ध करताच गोवा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करून आपले नैसर्गिकविधी उघड्यावर उरकण्यास मजबूर असलेल्या गरीबांना गुन्हेगार केले आहे. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनीही दमदाटीच्या जोरावर नवीन वाहतूक कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला तो निषेधार्ह आहे. सरकारच्या अनास्थेमुळे तसेच सर्वत्र बोकाळलेल्या भ्रष्टाचाराने गोमंतकीय हवालदिल झाला असून, आपले सरकार भ्रष्टाचारयुक्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य करावे किंवा आपल्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.