Wed, May 27, 2020 06:11होमपेज › Goa › अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ; एफआयआर दाखल

अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ; एफआयआर दाखल

Last Updated: Feb 08 2020 2:12AM
बार्देश : पुढारी वृत्तसेवा

करासवाडा-म्हापसा येथे एका खासगी संस्थेकडून चालविण्यात येणार्‍या विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीचा शारीरिक तसेच मानसिक छळ झाल्याच्या पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीस अनुसरून शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात एफआयआर नोंद केला.

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शारीरिक तसेच मानसिक छळाबाबतची तक्रार म्हापसा पोलिस स्थानकात दाखल करून तीन दिवस उलटले तरीही स्थानिक पोलिसांकडून संबंधित शाळा व्यवस्थापनावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याचा दावा करून रिपाइं-गोवाच्या पदाधिकार्‍यांनी सतीश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांची भेट घेऊन संशयितांना तातडीने गजाआड करण्याची मागणी केली. पीडित मुलीचे आई-वडील सामाजिक कार्यकर्ते किशोर राव त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

करासवाडा म्हापसा येथील खासगी जागेत गेली अनेक वर्षे इंग्रजी माध्यमाची शाळा कार्यरत असून या शाळेत शिक्षण घेणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या व्यवस्थापनाकडून शारीरिक तसेच मानसिक छळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून मासिक पाळीच्या काळातही त्या विद्यार्थिनीला स्वच्छतागृहात जाण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती पीडित मुलीच्या आईवडिलांनी स्थानिक पत्रकारांना दिली.

दरम्यान, या प्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात रितसर तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून संबंधित शाळा व्यवस्थापनावर कसलीच कारवाई होत नसल्याचे आढळून आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सतीश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांना निवेदन सादर केले. शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी करून दोषींना गजाआड करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणावरून घटनास्थळी माहिती घेण्यासाठी गेलेल्या स्थानिक वृत्त वाहिनीच्या वार्ताहरास अज्ञातांकडून मारहाण झाल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत दाखल झाली आहे.