Mon, May 25, 2020 04:40होमपेज › Goa › म्हादई लवादाच्या निवाड्याला सरकारने आव्हान द्यावे

म्हादई लवादाच्या निवाड्याला सरकारने आव्हान द्यावे

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 17 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी

म्हादईचे 13.42 टीएमसी पाणी कर्नाटकला  देण्याचा म्हादई लवादाच्या निवाड्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे. लवादाचा निवाडा हा गोव्याचा विजय असल्याचा सरकारच्या विधानाचा आपण निषेध करत असल्याचे मांद्रेचे  आमदार  दयानंद सोपटे यांनी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत  सांगितले.

म्हादई लवादाने बुधवारी  म्हादई पाणी वाटपासंदर्भात दिलेला  निर्णय हा गोव्याचा विजय   आहे,  असे विधान सरकारने  करणे म्हणजे गोमंतकीयांची फसवणूक आहे,अशी टीकाही त्यांनी केली.

सोपटे म्हणाले,  म्हादई लढयाला  1973  साली सुरवात   झाली. या लढयाला  45 वर्ष पूर्ण झाली असून  यावर आतापर्यंत गोवा सरकारने  कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.  मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूनही  म्हादई पाणी प्रश्‍नाबाबत गोवा सरकारने काय मिळवले, हाच मोठा प्रश्‍न आहे.

कर्नाटकला म्हादईच्या पाण्याचा एक थेंबदेखील देणार नाही, असे गोवा सरकारकडून म्हटले जायचे.  प्रत्यक्षात लवादाच्या निर्णयात कर्नाटकला 13.42 टीएमसी पाणी देण्यात आले.मग हा गोव्याचा विजय कसा,असा प्रश्‍न  त्यांनी केला.

प्रदेश काँग्रेस  प्रवक्‍ते अ‍ॅड. यतिश   नाईक म्हणाले,    म्हादईच्या पाण्यावर गोव्यातील सहा तालुके अवलंबून आहेत. या निवाड्याचा या तालुक्यांवर परिणाम  होणार आहे. 

म्हादई प्रश्‍नी राज्याचे हित जपण्यास गोवा सरकारला अपयश आले आहे. लवादाचा निवाडा गोव्याच्या जनतेच्या हिताचा नाही. लवादाने दिलेल्या निवाडयात गोवा सरकारला बाजू मांडण्यास कसे अपयश आले  हे नमूद करण्यात आल्याचेही अ‍ॅड. नाईक यांनी सांगितले.