Tue, May 26, 2020 07:49होमपेज › Goa › सीएए विषयी फेरविचार करण्यास सरकारला भाग पाडावे : कामत

सीएए विषयी फेरविचार करण्यास सरकारला भाग पाडावे : कामत

Last Updated: Jan 14 2020 1:41AM
मडगाव : प्रतिनिधी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मांच्या लोकांनी बलिदान केलेले असून सरकारला कुठल्याही धर्माच्या लोकांना वगळण्याचा हक्क नाही. सर्वांनी सीएए एनआरसी विरोधात लढा देत सरकारला याविषयी फेरविचार करण्यास भाग पाडावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.

सीएए, एनआरसी तथा जेएनयुच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्यांनी वरील आवाहन केले.

गोवा राज्य तसेच भारत देश धार्मिक सलोख्यासाठी मानले जातात. लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून सरकारने जातीयवाद तयार करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसपक्षही सीएए, एनआरसीला विरोध करत असून पक्षाची भूमिका  स्पष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आप पक्षाचे एल्विस गोम्स, प्रदीप पाडगावकर, वक्‍ता अरविंद भाटीकर, अरविंद काकोडकर व अन्य उपस्थित होते.

एल्विस गोम्स यांनी ठराव मांडले तर सर्व लोकांनी यास मान्यता देऊन मंजूर केले. लोकसभेने व राज्यसभेने मंजूर केलेला सीएएस कायदा धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम करत असल्याने निषेध व्यक्त केला. सदर कायदा धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम करत असल्याने त्वरित रद्द करावा, आदी ठराव मंजूर करण्यात आले.

सुरवातीला लोकांना या कायद्याविषयी माहिती नव्हती, मात्र जागृती रॅली सभा होत असल्याने लोकांना माहीत होत आहे, म्हणून लोक विरोध करत आहे, असे एल्विस यांनी सांगितले. भाजपा ही बोगस जनता पार्टी आहे, म्हणून गोवा सरकारला बोगस मंत्र्यांची ओळख पटली नाही, अशी टीका त्यांनी केली. सरकार बोगस लोकांचा पाहुणचार करतात आणि मूळ भारतीयांना बाहेर काढू पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले. लोकांचे अहित असलेल्या गोष्टींचा आम्ही विरोध करत आहोत आणि यापुढेही करत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कायदा दुरुस्ती आणून सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला असून याचा निषेध आहे, असे मत अरविंद भाटीकर यांनी व्यक्त केले. सरकारने धर्माच्या आधारे देशात भेदभाव सुरू केला आहे म्हणून आम्ही विरोधात भांडत आहोत, असे भाटीकर म्हणाले. केंद्र सरकारने ‘हम करे सो कायदा’ म्हणत हिटलरशाही चालविली आहे, असाही आरोप त्यांनी केले. यावेळी इतर वक्त्यांचीही भाषणे झाली. यावेळी सीएए, एनआरसी विरोधात काळे झेंडे दाखवून विरोध दर्शविण्यात आला आणि ‘आमकां नाका आमकां नाका, सीएए आमकां नाका,’ ‘ले के रहेंगे आजादी,’ ‘सीएए से आजादी’, ‘सीएए वापस लो’, ‘हिंदू मुस्लिम शीख इसाई, हम सब भाई भाइर्’ असे नारे देण्यात आले.