Thu, May 28, 2020 07:50होमपेज › Goa › पूर्ण कार्यकाल मुख्यमंत्री भाजपचाच

पूर्ण कार्यकाल मुख्यमंत्री भाजपचाच

Published On: Oct 16 2018 1:40AM | Last Updated: Oct 16 2018 1:40AMपणजी : प्रतिनिधी

भाजप आघाडी सरकारातील घटक पक्ष एकमेकांना दिलेला शब्द पाळणार असून सरकार पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करणार आहे. राज्यात नेतृत्वबदल करण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसून भाजपचा मुख्यमंत्रीच पाच वर्षांसाठी कायम राहणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी  सांगितले. 

भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी मुख्यमंत्र्यांविना बैठक घेण्यात आली.   बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तेंडुलकर म्हणाले की,  पर्रीकर आजारी पडल्यानंतर विधिमंडळ गटाची बैठक न झाल्याने ती सोमवारी घेण्यात आली.
या बैठकीत भाजप पक्ष संघटन सक्षम करण्यासंदर्भात तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी व्यूहरचनेवर सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. भाजपच्या आमदारांसह विरोधकांच्या मतदारसंघांवरही नव्याने पक्षकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कार्यकर्त्यांच्या अडचणी वा समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला एका मंत्र्याने पक्ष मुख्यालयात येण्याचे निश्‍चित करण्यात आले. प्रत्येक मंत्र्याकडे दोन मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर आणि पक्षाचे सरचिटणीस तानावडे यांनी सोमवारी  सकाळी मुख्यमंत्री पर्रीकर यांची दोनापावला येथे भेट घेऊन त्यांना विधिमंडळ गटाची बैठक बोलावल्याबद्दल माहिती दिली. या बैठकीला पर्रीकर यांनी मान्यता दिली असल्याचे सांगून तेंडुलकर म्हणाले की, आम्ही पर्रीकरांच्या घरी पोचलो तेव्हा, ते टीव्हीवर बातम्या पाहत होते. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांना विश्रांतीची गरज आहे. आणखी 2-4 दिवसांनी पर्रीकर भाजपच्या मंत्र्यांना आणि महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांना भेटणार आहेत. पक्ष  नेतृत्वाबद्दल विधिमंडळ बैठकीत कोणीही प्रश्‍न उपस्थित केला नाही. यामुळे नेतृत्वबदलाचा प्रश्‍नच येत  नसून मुख्यमंत्रिपदी पर्रीकरच राहणार आहेत. भाजपचा मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी कायम राहणार आहे. या बैठकीत भाजपचे चौदापैकी 10 आमदार उपस्थित होते. याविषयी  सभापती डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, विधिमंडळ गटाची बैठक अनेक दिवसांपासून झाली नव्हती. त्यामुळे सोमवारी अशी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. भाजपचे तीन आमदार आजारी असल्याने तर मयेचे आमदार प्रवीण झांट्ये हे मुंबईला गेल्याने हजर नव्हते. मात्र उर्वरीत 10 आमदार सोमवारच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे प्रशासन कसे सुरळीत चालावे, आमदारांची काही अडलेली विकासकामे कशी होतील, याबाबत चर्चा झाली.  

पर्रीकरांवर घरीच उपचार; निर्णय कुटुंबीयांचा : सावंत

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल राज्यात अनेकजण अफवा पसरवत असून त्या क्लेशदायी आहेत.  दिल्लीहून स्टे्रचरवरून झोपून आलेले पर्रीकर दोनापावला येथील निवासस्थानी पोचल्यावर स्वत:हून उठून व्हीलचेअरवर बसून वरच्या मजल्यावर गेले. पर्रीकर यांची खोली सर्व वैद्यकीय यंत्रणांनी सुसज्ज करण्यात आली असून चोवीस तास ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहेत. गरज पडल्यास ‘108’ रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरातच उपचार  सुरू राहणार आहेत. पर्रीकर यांच्या कुटुंबीयांनी मिळून एकत्रितपणे हा निर्णय घेतला असल्याचे सभापती सावंत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्रिपदाची ‘व्हेकन्सी’ नाही : माविन 

मुख्यमंत्रिपदाची आज ‘व्हेकन्सी’ नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे प्रशासन कसे चालवावे, रोजगाराचा प्रश्‍न कसा सोडवावा, नोकर भरती कधी करायची या व अन्य विषयांवर प्रदेश भाजपने लक्ष देण्याचे ठरविले आहे. भाजपचे केंद्रीय आणि स्थानिक नेते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम असून सर्व घटक पक्ष आणि अपक्ष आमदारही भाजप सरकारसोबत आहेत.