Mon, May 25, 2020 04:50होमपेज › Goa › सरदेसाईंच्या करिष्म्यावर सावईकरांचे भवितव्य 

सरदेसाईंच्या करिष्म्यावर सावईकरांचे भवितव्य 

Published On: Mar 21 2019 12:57AM | Last Updated: Mar 20 2019 11:06PM
मडगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मिशन सालसेत यशस्वी होऊ शकले नाही. पण,2012च्या विधानसभा निवडणुकीत सासष्टीतून निवडून आलेल्या अपक्ष आमदारांबरोबर प्रादेशिक पक्षाच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यास माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना यश आले होते. याचा फायदा 2014 साली भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेल्या नरेंद्र सावईकर यांना झाला होता. यावेळी परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर आहे. सासष्टीतील आठ आमदारांपैकी सहाजण काँग्रेसचे आमदार आहेत तर एक ख्रिस्ती आमदार राष्ट्रवादी पक्षाचा आहे. भाजपची संपूर्ण मदार यावेळी उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर असून लोकसभा निवडणुकीत ते काय करिष्मा करतात, यावर सासष्टीत खासदार नरेंद्र सावईकर यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सासष्टी तालुक्यात आठ मतदारसंघ येतात. या आठही मतदारसंघात ख्रिस्ती आमदारांची संख्या सहा असून  दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई हे दोघेच आमदार हिंदू आहेत.भाजपचा एकही आमदार सासष्टीत निवडून आलेला नाही. सत्ताधारी सरकारला पाठिंबा दिलेले विजय सरदेसाई गोवा फॉरवर्ड पक्षाचे एकमेव आमदार सासष्टीत भाजपच्या बाजूने या लोकसभा निवडणुकीत काम करू शकतात. त्यांच्या भूमिकेकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे. 

विजय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की गोवा फॉरवर्ड पक्षाचा लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग असणार नाही. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राज्यात नेतृत्वबदल झाले असून घटक पक्षांनी सुद्धा आपले इस्पित साध्य करून घेतले आहे. पर्रीकर यांच्या विश्‍वासातील समजले जाणारे फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई हे प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे सासष्टीत सध्या भाजपला सरदेसाई यांचा आधार आहे. सासष्टी तालुक्यातील नावेली मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईजिन फालेरो तेथील आमदार आहेत, या मतदारसंघाला बाणावली मतदारसंघ लागून आहे. बाणावलीत राष्ट्रवादीचे चर्चिल अलेमाव आमदार आहेत.वेळ्ळीत काँग्रेसचे फिलिप नेरी आमदार आहेत.  कुडतरी मतदारसंघात काँग्रेसचे अलेक्स रेजिनाल्ड आमदार आहेत. कुंकळ्ळी मतदारसंघात क्लाफासियो डायस हे सुद्धा काँग्रेसचे आमदार आहेत. मडगावात सलग 25 वर्षे निवडणूक येणारे दिगंबर कामत हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत.आठ पैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाचे असून एक राष्ट्रवादी आणि एक गोवा फॉरवर्डचा आमदार आहे.

उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांचे मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याबरोबर बिनसल्याचे बोलले जाते. फातोर्डा मतदारसंघाला आलेले महत्व मडगाव मतदारसंघाचे महत्व कमी करण्यात कारणीभूत ठरले आहे. फातोर्डा मतदारसंघासाठी वेगळी पालिका, शिगमोत्सव आणि कार्निव्हालच्या मिरवणूक फातोर्डा मतदारसंघात आयोजन, फातोर्डासाठी वेगळे पोलिस स्थानक,सर्व शासकिय कार्यालये फातोर्डा मतदारसंघातील माथानी साल्ढाना संकुलात नेण्याचा विषय, अशा बदलांमुळे मडगाव शहराचे महत्व आता कमी होत चालल्याने दिगंबर कामत काही प्रमाणात नाराज आहेत. 
कुडतरीचे आमदार अलेक्स रेजिनाल्ड हे विधानसभा निवडणुकी पूर्वी  सरदेसाई यांचे जवळजे मित्र होते.गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सरदेसाई यांनी त्यांना सहकार्य केले होते. पण सरदेसाई यांनी पर्रीकर सरकारला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यानंतर सरदेसाई आणि रेजिनाल्ड यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. नावेलीचे लुईजिन फालेरो आणि विजय यांच्यांत मैत्रीत्वाचे नाते आहे. फलिप नेरी यांच्या वेळ्ळी मतदारसंघात सरदेसाई  एक कृषी प्रकल्प आणू  पहात आहेत. बाणावलीचे आमदार चर्चिल अलेमाव आणि विजय यांच्यात फार्मेलीनयुक्त मासळीच्या प्रकरणात घाऊक मासळी बाजाराच्या विषयावरून दुमत निर्माण झाले होते.आता नरेंद्र सावईकर यांच्या विषयात सरदेसाई कशा प्रकारे सर्व राजकीय विरोधकांचे मन वळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 2012 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सासष्टीत राजकीय समीकरणे वेगळी होती. माजी मंत्री मिकी पाशेको यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून गोवा विकास पक्ष स्थापन केला होता. गोविप मधून ते नुवेतून निवडून आले होते, तर कायतु सिल्वा हे बाणावली मतदारसंघातून निवडून आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी या दोघा आमदारांचे चांगले सबंध होते. नावेली मतदारसंघात चर्चिल अलेमाव यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेले अपक्ष आमदार आवेर्तान फुर्तादो यांना पर्रीकर सरकारच्या काळात  कामगार आणि मच्छिमार मंत्री पद  देण्यात आले होते. या तिन्ही आमदारांचा साहाय्याने गेल्या लोकसभा निवडणुकीत सावईकर यांना सासष्टी तालुक्यात बर्‍याच प्रकारे मताधिक्य प्राप्त झाले होते. यावेळी परिस्थिती बदललेली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता सासष्टी तालुक्यात भाजपला केवळ सरदेसाई यांचा आधार आहे.

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की गोवा फॉरवर्ड पक्ष सत्ताधारी भाजप सरकारचा घटक पक्ष आहे. आम्ही एनडीए चे सुद्धा सद्स्य असून सरकारकडून देण्यात अलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणाऱ आहे. नरेंद्र सावईकर यांनी नऊ मार्च पासून अपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांचा भाजपवर विश्‍वास आहे. खाण अवलंबितांना सुद्धा भाजपकडून खाण व्यवसायाचा विषय सोडवला जाणार आहे, असा विश्‍वास आहे, अशी माहिती त्यांनी दिली.