Wed, May 27, 2020 17:19होमपेज › Goa › सावर्डे सांतोणच्या गुहेत मंदिराप्रमाणे घुमटी

सावर्डे सांतोणच्या गुहेत मंदिराप्रमाणे घुमटी

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:54AMमडगाव : विशाल नाईक

सावर्डे मतदारसंघातील सांतोण गावात हिराटेव्हाळ येथील ओहोळात असलेल्या त्या तीन गूढ गुहांमध्ये सुमारे पन्‍नास मीटर आत मंदिराप्रमाणे घुमटी, बसण्यासाठी दगड व एकाच ठिकाणी पायाच्या मोठ्या आकाराच्या खुणा आढळून आल्यामुळे या गुहांविषयी गूढ आणखीच वाढले आहे. दैनिक ‘पुढारी’ मधून वृत्त प्रसिद्ध होताच स्थानिक युवकांनी या गुहा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या गुहा येथील ग्रामदैवत श्री कुडडो आजोबा यांचे स्थान असल्याचाही दावा केला जात आहे.

दैनिक ‘पुढारी’ मधून सदर गुहांबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच वृत्ताची दखल घेत स्थानिकांनी हिराटेव्हाळ परिसराला भेट दिली. पेरिउडक येथील रामचंद्र बोरकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, या परिसरात वास्तव्य करूनसुद्धा आम्ही कधीच या गुहेत प्रवेश केला नाही.  रुपेश गावकर, रामचंद्र बोरकर, केनय फर्नांडिस, सोमेश देसाई व इतर युवकांनी गुहेत प्रवेश केला.    

युवकांना गुहेत साळचे काटे, विंचू, साप आदी प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे आढळून आले. सुमारे पन्नास मीटर आत एक बसण्याची जागा तयार करण्यात आली आहे. डोकीवर मंदिराप्रमाणे दगडाला घुमटीचा आकार देण्यात आला आहे. बसण्याच्या दगडाजवळ मोठ्या आकाराच्या पायाच्या खुणा दिसून आल्या. मात्र, गुहेतील वाटेवर कुठेच खुणा नव्हत्या, असेही दिसून आले. इतर दोन गुहांमध्ये पाण्याच्या प्रहावातून प्लास्टिकच्या बाटल्या येऊन अडकल्या होत्या.

रामचंद्र बोरकर म्हणाले की, गुहेतील खुणा येथील दैवत श्री कुडडो आजो यांच्या असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. याविषयी इतर गावकर्‍यांशी चर्चा करणार आहे. आम्ही या ठिकाणी पूर्वी येत होते. पण, गुहेत जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. या परिसरात कुडडो आजो यांचे अधिपत्य आहे. त्यामुळे या गुहा त्यांच्याच असण्याची शक्यता त्यांनी व्यक्‍त केली. 

बाबूर्लीवाडा येथील नव्वद वर्षे वयाचे गोविंद वेळीप व त्यांची पत्नी तुळशी वेळीप यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, कुडडो आजो यांचा त्या गुहेत संचार असू शकतो. विठोबा वेळीप यांनीही या परिसरात आणखी काही अशाच प्रकारच्या खुणा असल्याचे सांगितले.

Tags : The dome , temple ,Savdeve Santan, cave goa news