Sat, Aug 24, 2019 09:47होमपेज › Goa › राज्यात थंडीचा कडाका वाढला

राज्यात थंडीचा कडाका वाढला

Published On: Jan 06 2019 2:20AM | Last Updated: Jan 06 2019 2:20AM
पणजी :  प्रतिनिधी

राज्यात थंडीचा प्रभाव वाढला असून मागील चार दिवसांपासून किमान सरासरी तापमान 17 ते 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद होत आहे. तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता गोवा वेधशाळेकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.

वाळपई, सत्तरी, पेडणे, काणकोण, डिचोली, केपे यासारख्या अंतर्गत भागांमध्ये रात्रीच्यावेळी पारा 12 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद होत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने राज्यात हिवाळ्याचे असतात. या काळात बर्‍यापैकी थंडी जाणवते.  यंदा मागील वर्षाच्या तुलनेत बरीच थंडी पडली आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक कमी तापमान 18 डिग्री सेल्सिअस इतके नोंद झाले होते. तर यावर्षी 17 डिग्री सेल्सिअस इतके नोंद झाले आहे.

दिवसाच्या तापमानाच्या तुलनेत रात्रीच्यावेळी पारा घसरत आहे. मागील चार दिवसांपासून किमान सरासरी तापमान 17 ते 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद होत आहे.  शनिवारी पणजीत सर्वाधिक कमी तापमान 18 डिग्री सेल्सिअस इतके नोंद  झाले होते.

किमान तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किमान तापमानाप्रमाणे कमाल तापमानातदेखील घट होत आहे.  सरासरी 34 डिग्री सेल्सिअस इतके नोंद होणारे कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली उतरले आहे.