Wed, May 27, 2020 04:31होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी सकारात्मक तोडगा 

म्हादईप्रश्‍नी सकारात्मक तोडगा 

Last Updated: Dec 15 2019 1:24AM
पणजी : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये सुरू असलेल्या म्हादईचे पाणी वळवण्याबाबतचे प्रकरण लवकरच सकारात्मकरीत्या सोडवले जाणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राज्यपाल मलिक यांना आपण दोन दिवसांत याविषयी तोडगा जाहीर करणार असल्याचे फोनवरून कळविले असल्याचे सरकारी सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.  गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर मलिक यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी ही पहिली भेट आहे. या भेटीत राज्यपाल मलिक यांनी म्हादईविषयी नव्याने सुरू झालेल्या वादाबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने म्हादई नदीवरील कळसा -भांडुरा जलप्रकल्पाला पर्यावरण दाखला (ईसी) दिल्याचे पत्र दिल्याचे मलिक यांनी नमूद केले. 

राज्य सरकारकडून शुक्रवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या पत्रकात या भेटीविषयी माहिती देण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की, म्हादई पाणीप्रश्‍नी केंद्रीय वन मंत्रालयाने कर्नाटकाला दिलेल्या पत्रानंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडली. म्हादई नदीला गोव्याच्या दृष्टीने फार महत्त्व असून राज्याची ती जीवनदायिनी असल्याचा मुद्दा राज्यपाल मलिक यांनी मांडला. कर्नाटकाच्या कळसा-
भांडुरा जलप्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पत्रामुळे पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचे मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. पंतप्रधानांनी सर्व विषय समजून घेतला व त्यावर योग्य तो तोडगा काढला जाणार असल्याचे आश्‍वासन मलिक यांना दिले. 

राज्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांशी आणखी कोणत्या विषयावर चर्चा केली ते राज्य सरकारने या पत्रकात स्पष्ट केलेले नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 17 ऑक्टोबर रोजी कर्नाटकाला कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला (ईसी) दिल्याचे पत्र दिले होते. या पत्रामुळे गोव्यात वाद निर्माण झाला असून काँग्रेस, गोवा फॉरवर्डसहीत अनेक एनजीओ संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकाराचा निषेध व्यक्त केला होता. याविषयी सर्व राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री जावडेकर यांची भेटही घेतली होती. सदर पत्र रद्द अथवा संस्थगित करावे अशी राज्य सरकारची मागणी आहे. या पत्रासंदर्भात केंद्रीय मंत्री जावडेकर यांना गोव्यातील इफ्फीच्या उद्घाटनाला आले असता विरोधकांनी काळे बावटे दाखवून निदर्शने केली होती. मात्र, जावडेकर यांनी सदर पत्र मागे घेण्यासाठी दोन वेळा मुदत मागून घेतली असून अजूनही त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर गोवा सरकारला दिलेले नाही. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  राज्यपाल मलिक यांची हल्लीच भेट घेतली असता, हा विषय आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडणार असल्याचे मलिक यांनी त्यांना आश्‍वासन दिले होते. 

पत्राबाबत दोन दिवसात तोडगा
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावेळी म्हादईबाबत देण्यात आलेल्या पत्राबाबत दोन दिवसात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन जावडेकर यांनी राज्यपालांना दिले असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.