Sat, Jun 06, 2020 13:57होमपेज › Goa › फोंडा, डिचोलीत बंदला संमिश्र प्रतिसाद

फोंडा, डिचोलीत बंदला संमिश्र प्रतिसाद

Published On: Jan 10 2019 1:44AM | Last Updated: Jan 10 2019 1:44AM
फोंडा : प्रतिनिधी 

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्यात बुधवारी बंद पुकारण्यात आला होता, त्याला फोंडा भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी कामगारांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कुंडई, मडकई तसेच बेतोडा आदी औद्योगिक वसाहतीतील बहुतांश आस्थापने बंद ठेवली.कामगार संघटनांनी यावेळी कुंडई, बेतोडा, मडकईत निषेध फेर्‍या काढल्या. दरम्यान, फोंडा शहरातील बहुतांश आस्थापने व दुकानेही बंदच होती. संध्याकाळी काही दुकाने उघडण्यात आली. मासळी बाजार मात्र सुरू होता. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध म्हणून देशव्यापी बंदमध्ये गोव्यातील कामगार तसेच अन्य संघटनाही सहभागी झाल्या होत्या. फोंड्यात स्टेट बँकेचे व्यवहार सुरू होते. काही राष्ट्रीय बँका सोडल्यास बहुतांश सहकारी बँका, पोस्ट कार्यालय, खाजगी प्रवासी बसगाड्या, टॅक्सी सेवा बंद राहिल्या. प्रवाशांची भिस्त केवळ कदंबच्या बसगाड्यांवर होती. 

बंद जाहीर केल्यामुळे बहुतांश लोकांनी कामावर न जाता घरी बसणे पसंत केले. सरकारी कार्यालयातही लोकांची उपस्थिती कमी दिसली. फोंडा भागात वाहतूक सुविधा नसल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्याही अल्प होती. 

कुंडई, मडकई व बेतोडा औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी बंदमध्ये सहभाग घेत मोर्चा काढला. आयटकच्या या मोर्च्यात सहभागी कामगारांची संख्या लक्षणीय होती. कुंडई भागात काही ठिकाणी रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी ते दूर केले.

कामगारांचा मोर्चा निघाल्यानंतर सुरू असलेली काही आस्थापने बंद करण्यात आली. कामगार नेते राजू मंगेशकर यांच्यासह सुरेश नाईक, हरी गावडे, कृष्णा गावडे तसेच विराज गावडे व इतरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. राजू मंगेशकर यांच्या नेतृत्वाखालील मोर्चावेळी कामगारांनी घोषणाबाजी देत सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. रोजंदारी कामगारांना किमान रोजचे वेतन 600 रुपये द्यावे, मोटर वाहतूक कायद्यातील जाचक दुरुस्ती रद्द करणे, राज्यातील खाणी त्वरित सुरू करणे, कंत्राट पद्धती त्वरित बंद करणे, इंधनाचे दर कमी करून महागाई आटोक्यात आणणे तसेच अनेक मागण्या कामगारांनी यावेळी केल्या. मोर्चामुळे फोंड्यातील बाजारपेठेवरही काही अंशी परिणाम झाला. 

डिचोली : डिचोलीत  भारत  बंदला सकाळच्या सत्रात मोठा प्रतिसाद लाभला. मात्र दुपारनंतर या बंदला समिश्र प्रतिसाद लाभला. डिचोली आठवड्याचा बाजार असूनही सकाळ ते दुपारपर्यंत एकही फेरीवाले भाजीवाले फिरकले नाहीत. सर्व दुकाने बंद होती. मात्र, दुपारी 3 वाजल्यापासून बाजारात भाजी विक्रेते दाखल झाले. बहुतेक दुकाने बंद होती औद्योगिक वसाहतीतील सर्व व्यवहार सकाळच्या सत्रात बंद होते. शाळा सुरु होत्या. डिचोलीचे पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले. साखळी बाजारपेठेत काही दुकाने सकाळपासूनच सुरु होती. 

खाण कामगारांनी बंदला सहकार्य करण्याची मागणी केल्याने डिचोलीत पूर्ण पाठिंबा लाभला. डिचोलीत खाजगी प्रवासी बसेस बंद होत्या तर कदंबची सेवा काही प्रमाणात सुरु होती. त्यातून प्रवास करण्यासाठी मोठी गर्दी होती. पोलिसांनी सर्वत्र पहारा ठेवून स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  चोख व्यवस्था केली होती. सरकारी कार्यलयात उपस्थितीवर परिणाम जाणवला. बँक व इतर आस्थापनेही बंद होती.

केवळ कदंबच्या बसगाड्या

बंदमध्ये खाजगी प्रवासी, टॅक्सी बंद राहिल्यामुळे कदंब बसगाड्यांवर प्रवाशांची भीस्त राहिली. बंद जाहीर केल्यामुळे बहुतांश लोकांनी घरी बसणे पसंत केले. त्यामुळे कदंबवर वाहतुकीचा तेवढा ताण जाणवला नाही. फोंडा भागात बंदच्या काळात कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस बंदोबस्त मात्र चोख ठेवण्यात आला होता.