Wed, May 27, 2020 18:12होमपेज › Goa › पणजी पोटनिवडणूक १९ मे रोजी

पणजी पोटनिवडणूक १९ मे रोजी

Published On: Apr 10 2019 1:54AM | Last Updated: Apr 10 2019 1:37AM
पणजी : प्रतिनिधी

विधानसभेच्या पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक  जाहीर करण्यात आली आहे.  मतदान 19 मे रोजी  आणि  मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे यासंदर्भात आदेश मुख्य निवडणूक  आयोगाने  जारी केला आहे.  निवडणूक अधिसूचना  22 एप्रिल रोजी जारी केली जाईल. 

पणजी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 22  ते 29 एप्रिल या कालावधीत स्वीकारण्यात येतील, अर्जांची छाननी 30 एप्रिल रोजी होईल, तर 2 मे रोजी अर्ज मागे घेता येईल, असे निवडणूक आयोगाकडून कळवण्यात आले आहे. 

पणजीचे आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च रोजी निधन  झाले. त्यामुळे सध्या पणजीची जागा रिक्‍त झाली आहे.  लोकसभेच्या दोन जागांसह राज्यातील मांद्रे, शिरोडा व म्हापसा या विधानसभा मतदारसंघांत 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकांसोबत  पणजीचीही निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने टाळले होते.

राज्यात सध्या आचारसंहिता लागू असून 23 एप्रिल, म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत ही आचारसंहिता कायम असणार आहे. मात्र, ही आचारसंहिता संपण्याच्या आधीच पणजी पोटनिवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार पणजी पोटनिवडणुकीची मतमोजणी लोकसभा तसेच तिन्ही मतदारसंघांत होणार्‍या पोटनिवडणुकांच्या मतमोजणीसोबत अर्थात 23 मे रोजी एकत्रितपणे होणार आहे.  

दरम्यान, पणजी पोटनिवडणूक ही भाजपच्याद‍ृष्टीने प्रतिष्ठेची बनली आहे. पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचे बाबूश मोन्सेरात यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यासाठी त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचादेखील राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी  पणजी पोटनिवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्‍त केली जात आहे. मात्र, याबाबत अजूनही उत्पल पर्रीकर यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे   भाजपच्या उमेदवारीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. याशिवाय   काँग्रेस पक्षातर्फे पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व यतिन पारेख हेदेखील पणजी पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा  आहे.