Tue, May 26, 2020 09:36होमपेज › Goa › प्रशासन कोलमडल्याचे आरोप बिनबुडाचे

प्रशासन कोलमडल्याचे आरोप बिनबुडाचे

Published On: Oct 20 2018 1:44AM | Last Updated: Oct 20 2018 1:44AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने प्रशासन कोलमडले असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत. हे चुकीचे चित्र विरोधकांकडून दाखवले जात असून त्यात तथ्य नाही. पर्रीकर हेच मुख्यमंत्री असून या पदासाठी कोणालाही संधी नाही. मात्र, पर्यायी नेतृत्वाची आवश्यकता भासल्यास भाजपच्या हाय कमांडकडून चाचपणी केली जात आहे. मात्र, सध्या ‘भाजप म्हणजे पर्रीकर अन् पर्रीकर म्हणजे भाजप’ असे समीकरण आहे, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. 

येथील एका खासगी कार्यक्रमात मंत्री गुदिन्हो पत्रकारांना म्हणाले, की राज्यात चौफेर विकासाचे वार वाहत असून चांगले, कार्यशील  असे सरकार अस्तित्वात आहे. मांडवीवर तिसर्‍या पुलाचे, जुवारीवर दुसर्‍या समांतर पुलाचे तसेच राज्यभर महामार्ग रूंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. पेडणेतील नियोजित मोपा विमानतळ हे तर ‘विकासाचे इंजिन’ आहे.   राज्याचा होत असलेला विकास आणि आपल्या मतदारसंघातील  विकासाचा अभाव हे विरोधाभासी चित्र काँग्रेसच्या आमदारांना दिसत  आहे. त्यात स्थानिक जनतेकडून होणार्‍या मागण्या आणि अपेक्षाच्या दबावापोटी  काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये आले आहेत. या रांगेत काँग्रेसचे आणखीही दोन-तीन आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. 

काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते नाराज झाले असले तरी राजकारणात सर्वांना सर्ववेळी खूश ठेवणे शक्य नसते. या प्रवेशाच्यावेळी सर्वांना विश्‍वासात घेणे शक्य नाही. पक्षाच्या  आणि राज्याच्या भल्यासाठी सर्वांनी कधी ना कधी त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. आपणही ज्येष्ठ आणि अनुभवी आमदार असूनही पक्ष प्रवेशाबद्दल आपल्याला माहिती दिली नसल्याने आपण नाराज झालो नाही. भाजपात आलेले हे वादळ असून ते लवकरच शांत होणार असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.