Tue, May 26, 2020 07:28होमपेज › Goa › राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांबा नाही 

राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांबा नाही 

Last Updated: May 18 2020 1:45AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात सोमवारपासून (दि.18) ‘लॉकडाऊन-4’ सुरू होणार असून तो 31 मेपर्यंत लागू होणार आहे. या लॉकडाऊनसंबंधी नवे निर्देश सोमवारी संध्याकाळी जारी होणार असून राज्यातील आर्थिक उपक्रमात आणखी थोडी शिथिलता आणली जाणार आहे. राज्यात येणार्‍या रेल्वे प्रवाशांबाबत आणखी सतर्कता वाढवली जाणार असून सोमवारपासून तूर्त दिल्लीहून येणार्‍या ‘राजधानी एक्स्प्रेस’ला गोव्यात थांबा दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘व्हिडीओ’ संदेशाद्वारे रविवारी सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 वर पोचली आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ट्रेनमधून येणारे बहुतांश प्रवासी ‘रेड झोन’मधून येत असल्याने त्यातील प्रवाशांची सखोलचाचणी केली जाणार आहे. राजधानी एक्स्प्रेसमधून शनिवारी 288 प्रवासी राज्यात दाखल झाले असून त्यांना चाचणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात व त्यानंतर फातोर्डा स्टेडियमवर ठेवण्यात आले होते.

यात, रविवारी (दि.17) दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसमधून 368 प्रवासी राज्यात आले असून या प्रवाशांची चाचणी केल्यानंतर राज्यातील रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती आहे. रेल्वेतील ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांसोबत असलेल्या बोगीतील 15 ते 20 प्रवाशांना सरकारी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यात येणार्‍यांना चाचणी शुल्क बंधनकारक केले गेल्याने मौजमस्तीसाठी अथवा कोणतेही कारण नसताना येणार्‍यांना काही प्रमाणातआळा बसला आहे. चाचणी शुल्क वा गोमंतकीय असल्याचा पुरावा देण्यास सांगितल्याने रेल्वेतून येणार्‍या 750 प्रवाशांपैकी फक्त 250  लोकच येण्यास तयार झाले होते. 

राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन सोमवारपासून दिल्लीहून सुटणार्‍या राजधानी एक्स्प्रेसला गोव्यात थांबा घेता येणार नाही. मात्र, निजामुद्दीन एक्स्प्रेस राज्यातून पुढे जाणार असल्याने त्या गाडीला थांबा असेल. या गाडीतून या आठवड्यात 32 प्रवासी राज्यात आले असून त्या सर्वांची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली होती. रेल्वेतून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांचे सरकारी विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात प्रवेश करणार्‍या ट्रकांवरील चालक हे ‘रेड झोन’ विभागातून येत असून ते कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांची राज्याच्या सीमेवरच चाचणी केली जाणार आहे. सीमेवरील नाक्यांवर चालकांचे ‘स्कॅनिंग करणे’ सध्या सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्ण हे राज्यातील नसून ते अन्य राज्यांतून ‘आयात’ वा स्थलांतरीत झालेले आहेत. यामुळे, गोव्याच्या लोकांनी भिण्याची गरज नाही. मात्र लॉकडाऊन शिथिल झाला म्हणून गोमंतकीयांनी मुक्तपणे फिरू नये.

मडगावस्थित कोविड इस्पितळात 100 खाटांची सध्या सोय असून ही संख्या 160 पर्यंत वाढवण्याची सोय करता येणे शक्य आहे. यातील 25 पर्यंत रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्याची सोयही करता येणे शक्य आहे. गरज पडल्यास आणखी एक कोविड इस्पितळ उभारण्याची सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परीक्षेसाठी राज्यात 2460 वर्ग

राज्यातील दहावी व बारावीची परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहे. यात काही फेरफार केला जाणार नाही. राज्यात काही लोक नाहक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले असले तरी हे सर्व रुग्ण परराज्यातील आहेत. गोव्यातील कोणीही बाधित झालेले नाही, हे गोमंतकीय विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात घ्यावे. राज्यात परीक्षा केंद्रासाठी  2460 वर्ग तयार केले असून स्थानिक विद्यार्थ्यांनी परिसरातच परीक्षा द्यावी, यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातच परीक्षा केंद्र उघडण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीमेजवळच्या गावात परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.