Tue, May 26, 2020 04:18होमपेज › Goa › पंतप्रधानांकडून गोवेकरांना पुन्हा तीच आश्‍वासने

पंतप्रधानांकडून गोवेकरांना पुन्हा तीच आश्‍वासने

Published On: Apr 11 2019 2:02AM | Last Updated: Apr 10 2019 11:30PM
पणजी : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बांबोळी येथे झालेल्या सभेत दरवेळीप्रमाणे गोमंतकीयांना केवळ आश्‍वसनांचे गाजर दाखवले. राज्यासाठी खाण व्यवसाय किती महत्वाचा आहे, याची कल्पना असून देखील खाणी सुरू करण्यासंदर्भात मोदी यांनी ठोस असे काहीच सांगितले नाही. रोजगार, मस्योद्योग, स्मार्ट सिटी या विषयांवरही लोकांच्या पदरी केवळ  थापाच पडल्या.  पंतप्रधानांनी पुन्हा तीच आश्‍वासने दिले असून त्यांची यांची ही सभा असफल ठरली, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

कवठणकर म्हणाले, की राज्यातील खाण विषय सोडवणार इतकेच आश्‍वासन मोदी यांनी सभेत दिले. गेली 5 वर्षे केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असताना पंतप्रधान काहीच करू शकले नाहीत. राज्यातील खासदारांसोबत या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक घ्यायला मोदी यांना  वेळ नव्हता. त्यामुळे आता खाण प्रश्‍न कसा सोडविणार  व जनतेने त्यांच्यावर पुन्हा का विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

मस्योद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र विभाग ठेवू असे आश्‍वासन काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देखील दिले होते. तेच आवाश्‍वसन पंतप्रधानांनी पुन्हा दिले असून त्यांनी गांधी यांची नक्कल केला आहे. पंतप्रधानांच्या या कॉपीनंतर चौकीदार कॉपीकॅटही आहेत हे समजले आहे, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात रोजगार व पर्यटन क्षेत्र वाढ झाली असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केला. सदर दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालेली नसून उलट पर्यटन क्षेत्रात मंदी आली आहे, हे सारेच जाणतात. स्मार्ट सिटी ची हालतही पंतप्रधानांनी पाहिलेली नसावी. भाषणे देण्यापूर्वी त्यांनी राज्यात फिरून याचा अभ्यास करण्याची गरज होती, असे मत कवठणकर यांनी व्यक्त केले. 

पंतप्रधान मोदी यांनी 2016 साली राज्यात घेतलेल्या सभेत अशीच खोटी आश्‍वासने दिली होती. नोटाबंदी असफल ठरल्यास जनतेने आपल्याला शिक्षा द्यावी, असे म्हटले होते. खर्‍या अर्थाने पंतप्रधान मोदींचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच ठरला व कित्येक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. या बाबत  मोदी यांनी सभेत माफी मागायला हवी होती. 

काँग्रेसच्या न्याय या किमान उत्पन्न हमी योजनेला भाजप सरकार घाबरले आहे. त्यामुळे विविध पध्दतीने जनतेला भूरळ घालत आहेत. जनतेने पंतप्रधानाच्या आश्‍वासनांना बळी पडु नये, असेही कवठणकर यांनी सांगितले.