Wed, May 27, 2020 19:04होमपेज › Goa › आयआयटी प्रकल्प गुळेलीऐवजी सांग्यातच उभारावा : आ. गावकर

आयआयटी प्रकल्प गुळेलीऐवजी सांग्यातच उभारावा : आ. गावकर

Published On: Sep 05 2019 1:42AM | Last Updated: Sep 05 2019 1:42AM
पणजी : प्रतिनिधी
आयआयटी प्रकल्प गुळेली-सत्तरी येथे उभारण्याचा सरकारने घेतलेला निर्णय सांगेवर अन्याय करणारा आहे. याबाबत फेरविचार करून सांगेतच उभारण्याचा निर्णय सरकारने करावा, अशी मागणी सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी  पत्रकार परिषदेत केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगे येथून प्रस्तावित आयआयटी प्रकल्प हलवून तो गुळेली येथे उभारण्याचा निर्णय करताना सरकारने आपल्याला विश्‍वासात घेतले नसल्याची टीकाही त्यांनी  केली.

आमदार  गावकर म्हणाले की,   31  ऑगस्ट रोजी  पार पडलेल्या गोवा राज्य मंत्रीमंडळाच्या   बैठकीत   सांगे येथील प्रस्तावित  आयआयटी गुळेली-सत्तरी येथे  उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात या आयआयटीसाठी  सांगे येथे तीन ठिकाणी जागा सरकारला दाखवण्यात आल्या होत्या. यात   कोटार्ली, रिवण व उगवे  येथील जागांचा समावेश होता. मात्र  आर्थिक स्थितीचे कारण देऊन सांगे येथील जागा आयआयटीसाठी संपादित करू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 31 ऑगस्टपर्यंत  आयआयटीसाठी  जागा  निश्‍चित करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय  केंद्राच्या आयआयटी समितीला कळवणे आवश्यक होते. मात्र सांगे येथील जागेचा निर्णय न झाल्याने अखेर आयआयटी गुळेलीत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी  सांगितले. सांगे हा मागासलेला भाग असून सरकारी 
नोकर्‍यांच्या   तसेच विकासाच्या  बाबतीत देखील हा भाग मागेच आहे. काणकोण येथील  आयआयटी उभारण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर  सांगे येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  तेव्हा  हे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार   आयआयटीसाठी जागा देखील पाहण्यात येत होत्या असे गावकर यांनी सांगितले.

सांगे येथे  आयआयटीसाठी  17 लाख चौरस मीटर  जागा उपलब्ध असून  त्यावर कुठलेही अतिक्रमण नाही. सांगे येथे आयआयटी उभारण्यासंदर्भात सरकारकडे आपण सतत पाठपुरावा  केला. मात्र पदरात निराशा पडली.  गुळेली येथे आयआयटी उभारण्याचा निर्णय घेऊन सरकारने  सांगेवर अन्याय  केला असल्याची टीका  गावकर यांनी  केली.

सरकारला  सांगेचा अपक्ष आमदार या नात्याने  पाठींबा देऊन देखील सांगेवर अन्याय करण्यात आला. दक्षिण गोवा नेहमीच  चांगल्या तसेच मोठया विकास प्रकल्पांपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे  सरकारने आयआयटीबाबत निर्णयावर फेरविचार करावा असे त्यांनी सांगितले.