Thu, Jul 02, 2020 13:40होमपेज › Goa › पीडिता बेपत्ता होणे हा सरकारचा निष्काळजीपणा

पीडिता बेपत्ता होणे हा सरकारचा निष्काळजीपणा

Published On: May 15 2019 1:51AM | Last Updated: May 14 2019 11:31PM
पणजी : प्रतिनिधी

बाबूश मोन्सेरात बलात्कार प्रकरणातील पीडित युवती बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भाजप व काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपने बेपत्ता प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर काँग्रेसने पीडिता बेपत्ता होणे म्हणजे सरकारचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला आहे. 

या बलात्कार प्रकरणातील पीडित युवती दक्षिण गोव्यातील एका पुनर्वसन केंद्रातून बेपत्ता झाल्याचे समारे आले आहे. याप्रकरणी महिला व बाल कल्याण खात्याने वेर्णा पोलिसांकडून अहवाल मागितला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, या पीडितेला पूर्ण सुरक्षा मिळणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. पीडिता गायब झाल्याने सरकारचा निष्काळजीपणा समोर आला आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री हे याविषयी उत्तर देण्यास जबाबदार ठरतात. 

या घटनेवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलडमली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोन्सेरात हे काँग्रेसचे पणजी पोटनिवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यामुळेच पीडिता बेपत्ता होण्याच्या विषयावरून भाजपकडून गोंधळ तसेच संशयाचे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

या बेपत्ता प्रकरणामुळे कुणाला राजकीय फायदा व नुकसान होणार हे सर्वांनाच ठाऊक आहे. या प्रकरणी चौकशी होणे गरजेच आहे. बेपत्ता युवतीचा शोध घ्यावा, या विषयावरुन गलिच्छ राजकारण करू नये. मोन्सेरात यांनी त्यांच्याविरोधात नोंद असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रसिध्द करावी, अशी मागणी  यापूर्वी भाजपने केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी या बलात्कार प्रकरणातील पीडित युवती बेपत्ता होते याचा काय अर्थ होतो असा प्रश्‍नही चोडणकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर म्हणाले, बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्कार प्रकरणी आरोप असून 3 जून रोजी आरोप निश्‍चितीसंदर्भात न्यायालय निवाडा देणार आहे. त्यापूर्वीच ही पीडिता गायब झाली आहे. त्यामुळे यामागे काही कटकारस्थान तर नाही ना अशी शंका येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बेपत्ता प्रकरणाची सरकारने कसून चौकशी करावी. या पीडितेकडून सत्य काय ते समजेल. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, असेही तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.