Mon, May 25, 2020 13:40होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीसाठी वेळ द्यावा 

मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीसाठी वेळ द्यावा 

Published On: Oct 23 2018 1:32AM | Last Updated: Oct 23 2018 1:32AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जर भाजपाचे सर्व आमदार, मंत्री  व पदाधिकारी भेटू शकत असेल तर विरोधी पक्षनेते म्हणून आपल्यालाही त्यांनी भेटण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी केली आहे. 

कवळेकर म्हणाले, की आपण आजारी असलेल्या मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पर्रीकर यांना त्यांचे नातलग, अधिकारी, भाजप मंत्री- आमदार भेटू शकतात, तर आपण कॅबिनेट दर्जाचा असल्याने त्यांनी आपणाला भेट देणे आवश्यक  आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपात गेलेल्या दोन आमदारांनीही पर्रीकर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतल्याचे नुकतेच सांगितले गेले. पर्रीकर यांनी , जर प्रत्यक्ष भेट शक्य नसल्यास निदान  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी कवळेकर यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’ उपेंद्र जोशी यांना पत्रकारांसमोर फोन करून कवळेकर यांनी वेळ देण्याची विनंती केली. आपण काँग्रेस विधिमंडळ गटासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी  जोशी यांना सांगितले. यावेळी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले, की आम्हाला लोकांनी राज्य कारभार चालवण्यासाठी निवडून  दिलेले आहे. जर आपण हे काम व्यवस्थित करू शकत नसल्यास सदर जबाबदारी दूसर्‍या व्यक्तीकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री पर्रीकर आजारी असूनही पद सोडण्यास तयार नाही. याचा अर्थ प्रशासन कोसळले असून जनतेला त्रास पडत आहे. 

आपला राजीनामा म्हणजे  अफवा : राणे 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आपण  काँग्रेस कदापि सोडणार नसल्याचे सांगून त्यांच्याबाबतच्या राजकीय अफवांना पूर्णविराम दिला. भविष्यात काहीही घडले तरी आपण काँग्रेसमध्येच राहणार आहे. आपण पक्ष सोडून जाणार असल्याची बातमी काही वृत्तपत्रात आली असून ती वाचून चुकीचा संदेश जाऊ शकतो. यासाठी खात्री करून घेतल्याशिवाय अशा  बातम्या देऊ नयेत, अशी  विनंती राणे यांनी माध्यमांना केली.