Mon, May 25, 2020 13:15होमपेज › Goa › जीवरक्षकांना सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नव्हते

जीवरक्षकांना सामावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नव्हते

Last Updated: Feb 13 2020 12:05AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा  
जीवरक्षकांना  मनुष्यबळ विकास महांमडळात (जीएचआरडीसी) सामावून घेण्यासंदर्भात  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी   आश्वासन दिले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून  स्पष्ट करण्यात आल्याचे दृष्टी कंपनीने जारी केलेल्या  प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संपकरी  जीवरक्षकांना  जीएचआरडीसी अंतर्गत  सेवेत  सामावून घेतले जाईल, तसेच  45 वर्षे झाल्यानंतर  जीवरक्षकांना  सरकारी जलतरण तलाव व हॉटेलमधील तलावांमध्ये प्रशिक्षक म्हणून  नोकरी दिली जाईल, असे आश्वासन  मुख्यमंत्र्यांनी दिले  असल्याचे कामगार युनियनकडून   सांगण्यात आले होते.  पुढील आठवड्यात होणार्‍या बैठकीत या विषयावर  व  जीएचआरडीसी अंतर्गत नोकरीस पात्र असणार्‍या जीवरक्षकांची  यादी तयार करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने केली असल्याचेही यावेळी युनियनकडून  सांगण्यात आले होते. 

मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कामगार युनियनसोबत  मुख्यमंत्र्यांची चर्चा  झाली. मात्र, जीएचआरडीसीमध्ये  जीवरक्षकांना सामावून घेण्याचा विषय चर्चेस आला नाही. कामगार युनियनला  त्याबाबत  कोणतेही आश्वासन  मुख्यमंत्र्यांकडून दिले गेले नाही.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून  जीवरक्षकांच्या नावांची यादी मागवली गेली नाही. शासकीय पदांसाठी कोणतीही नवी भरती (जर त्यांची योजना आखली असेल तर) सध्याच्या कार्यपद्धतीनुसार केली जाईल, ती  प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी खुली असेल आणि कोणताही विशेष अपवाद  नसेल ,असे  कळविले असल्याचे दृष्टी कंपनीकडून प्रसिध्दी पत्रकात नमूद  करण्यात आले आहे.