Wed, May 27, 2020 04:52होमपेज › Goa › खाण बंदीचा फटका भाजपला बसणार नाही : मंत्री श्रीपाद नाईक

खाण बंदीचा फटका भाजपला बसणार नाही : मंत्री श्रीपाद नाईक

Published On: Mar 07 2019 8:35PM | Last Updated: Mar 07 2019 8:35PM
मडगाव : प्रतिनिधी 

खनिज व्यवसाय कसा बंद पडला आणि कोणामुळे बंद पडला याची जाणीव सर्व खाण अवलंबितांना आहे. शहा आयोग कोणी निर्माण केला, खाणींचे पर्यावरण दाखले कोणत्या सरकारने मागे घेतले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात कोण गेले आणि गोव्यावर कोणी हे संकट आणले हे खाण अवलंबितांना माहिती आहे. पण सरकार आमचे असल्याने या संकटातून लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी आमच्यावर होती. सत्य काय आहे हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे खाण बंदीचा फटका भाजपला बसणार नाही, असे ठाम मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

मडगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. खाणी सुरू व्हाव्यात यासाठी तिन्ही खासदार प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाणी बंद झालेल्या आहेत. त्यामुळे कायद्याचा योग्य प्रकारे अभ्यास करूनच खाणी सुरू कराव्या लागणार आहेत. आपला देवावर विश्वास असून आज न उद्या खाणी सुरू होतील अशी आशा आहे, असे नाईक म्हणाले.

कायद्यात बदल करून खाणी सुरू व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू होते, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पुढील पावले उचलली आहेत. काही लोक अपप्रचार करत आहेत, पण भाजपला बोट दाखवून काही उपयोग होणार नाही हेही लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे पोट निवडणूक किंवा लोकसभा निवडणुकीवर या विषयाचा परिणाम होणार नाही, असे श्रीपाद नाईक म्हणाले. लोकांना पटवून देण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहे. या पूर्वी खाण अवलंबितांना सरकारने मदत केली होती. सरकारची आर्थिक बाजू भक्कम असल्याने पुढेही त्याना मदत करण्याचे प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.