Mon, May 25, 2020 10:47होमपेज › Goa › भाजपची ‘बी टीम’ कोण हे कळले  

भाजपची ‘बी टीम’ कोण हे कळले  

Published On: Apr 24 2019 1:37AM | Last Updated: Apr 24 2019 1:37AM
मडगाव : प्रतिनिधी 

भारातीय जनता पक्षाला मतदान केले तरी चालेल, पण आम आदमी पक्षाला मतदान करू नका, असे आवाहन काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी केल्याने काँग्रेस विरुद्ध ‘आप’ असा वाद निवडणुकीच्यावेळी निर्माण झाला. भाजपची ‘बी टीम’ कोण आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे, असे प्रत्युत्तर ‘आप’चे उमेदवार एल्विस गोम्स यांनी मंगळवारी दिले आहे. 

‘आप’ ही भाजपची ‘बी टीम’ आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. मंगळवारी मतदान केल्यानंतर कुडतरीत पत्रकारांनी सार्दिन यांना छेडले असता ज्या लोकांना काँग्रेसला आपले मत द्यायचे नसेल त्यांनी भाजपसाठी मतदान केले तरी चालेल, पण ‘आप’ला मतदान करू नये, असे आवाहन केले. भाजपला मतदान केले तर ते गृहीत तरी धरले जाईल, पण ‘आप’ला जिंकण्याची एक टक्काही गॅरंटी नाही. त्यामुळे ‘आप’ला मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी केले. सार्दिन यांचा या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रसृत झाल्यानंतर सर्वत्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

‘आप’चे दक्षिण गोवा उमेदवार एल्विस गोम्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सार्दिन यांना आपला पराभव दिसू लागल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यातून ते बेताल वक्तव्ये करत आहेत. सार्दिन यांच्यात जिंकण्याची ताकत राहिलेली नाही. ज्या अर्थी ते भाजपला मतदान करा, असे आवाहन करत आहेत त्या अर्थी भाजपची ‘बी टीम’ कोण हे लोकांना कळून चुकले आहेे. कुंकळ्ळी येथे ईव्हीएम यंत्र चाचणीत गोंधळ निर्माण झाला होता. याची चौकशी व्हावी, असेही त्यांनी सांगितले. ‘आप’चे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी काँगेस ही भाजपची बी  टीम आहे, असा आरोप केला आहे. 

सार्दिनच्या विधानाचा भाजपकडून गैरअर्थ : कवठणकर

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी केलेल्या विधानाचा भाजप  कार्यकर्त्यांनी चुकीचा अन्वयार्थ लावून तो व्हिडीओ सोशल मीडियात प्रसृत करून मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण केला, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते सुनील कवठणकर यांनी सांगितले. आपने काँग्रेसची मते फोडण्याचा भरपूर प्रयत्न केला असून ‘आप’कार्यकर्त्यांकडूनही जनतेत अपप्रचार करण्यात आला होता. सार्दिन हे दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या वाटेवर असून ते कधीही भाजपला मते द्या असे म्हणणार नाहीत, असा दावा कवठणकर यांनी केला.