Fri, May 29, 2020 22:35होमपेज › Goa › राज्यात आज प्रचार सभांचा धडाका

राज्यात आज प्रचार सभांचा धडाका

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 1:52AM
पणजी/मडगाव : प्रतिनिधी

लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचार शिगेला पोचला असून शनिवारी एकाच दिवशी  भाजपकडून सहा ठिकाणी आणि काँग्रेसकडून दोन ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे शनिवार प्रचाराच्या द‍ृष्टीने राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी (21 एप्रिल रोजी) संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या धडाडणार्‍या तोफा शांत होणार आहेत. या पाच जागांसाठी 23 एप्रिल रोजी (मंगळवारी) मतदान होणार असून निवडणूक मतदान केंद्रे सज्ज होत आहेत.

भाजप आणि काँग्रेसने शनिवारी एकाच दिवशी अनेक ठिकाणी प्रचाराच्या जाहीर सभांचा धडाका लावला आहे. रविवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जाहीर सभा शनिवारी आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपने दक्षिण गोव्यात पाच ठिकाणी तर उत्तर गोव्यात वाळपई येथे मिळून सहा जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. काँग्रेसने पर्वरी आणि केपे येथे मिळून दोन जाहीर प्रचार सभांचे आयोजन केले  आहे. 

शनिवारी वाळपई मतदारसंघातील उदीवाडा - उसगाव येथे संध्या. 5 वा. भाजपची जाहीर सभा असून त्यात लोकसभेचे उमेदवार श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, दामू नाईक  भाषण करणार आहेत. 

कुडचडे येथील कदंब बस स्थानकाजवळ शनिवारी संध्या. 5 वा. होणार्‍या सभेत भाजपचे उपाध्यक्ष तसेच   राजस्थान व जम्मू काश्मीरचे भाजपचे प्रभारी अविनाश राय खन्ना  सहभागी होेणार आहेत. 
शिरोडा मतदारसंघात भाजपची जाहीर सभा शनिवारी संध्या. 5 वा. आयोजित करण्यात     आली असून त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर, मंत्री दीपक पाऊसकर, उमेदवार नरेंद्र सावईकर, माजी मंत्री रमेश तवडकर यांची भाषणे होणार आहेत.

कुंकळ्ळी येथील पिकअप स्टँड जवळ संध्या. 5.30 वा. जाहीर  सभा होणार असून या सभेत   उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, मंत्री रमेश तवडकर यांची भाषणे  होणार आहेत. 

मडगाव येथील लोहिया मैदानावर संध्या. 6 वा. भाजपची  प्रचार सभा आयोजित  करण्यात आली असून या सभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, रालोआ चे घटक असलेले उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई  यांची भाषणे होणार आहेत.

दाबोळी मतदारसंघात दाबोळी जंक्शन जवळ शनिवारी संध्या. 6 वा. भाजपची जाहीर सभा मंत्री माविन गुदिन्हो यांनी आयोजित केली आहे. या सभेत  एलिना साल्ढाणा, आमदार कार्लुस आल्मेदा उपस्थित  राहणार आहेत.  माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी उपासनगरातील   एकता हाऊस कॉलनीत  कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असून त्यात साल्ढाणा यांच्यासह उमेदवार नरेंद्र सावईकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड मार्गदर्शन करणार आहेत. 

सिद्धू यांची आज फटकेबाजी 

काँग्रेसचे दोन्ही जागांसाठी एकमेव स्टार प्रचारक म्हणून माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू शनिवारी राज्यात दाखल होणार असून ते केपे नगरपालिका उद्यानात संध्या.5 वा. आणि त्यानंतर पर्वरी येथील संत गाडगे महाराज सभागृहात 7 वाजता लोकांसमोर आपल्या अनोख्या शैलीत  भाषण करणार आहेत. पर्वरीच्या सभेत माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांचा काँग्रेेसमध्ये ‘घरवापसी’ होणार आहे. 

सांगेत भाजपनंतर काँग्रेसची सभा 

सांगेवासीयांना एका तासाच्या अंतराने राष्ट्रीय पक्षाच्या दोन विविध सभा पाहायला मिळणार आहेत. आज शनिवारी सायंकाळी चार ते सहापर्यंत बस स्थानकावर काँग्रेसने सभेचे आयोजन केले असून त्याच्या एका तासानंतर सात वाजल्यापासून भाजपची सभा त्याच ठिकाणी होणार आहे. सांगेची  सभा सुभाष फळदेसाई यांनी आयोजित केल्याने या सभेला सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर उपस्थित राहणार की नाही, याकडे सांगेवासीयांचे लक्ष लागून आहे.