Wed, Jul 08, 2020 12:17होमपेज › Goa › आयात मासळी तपासणीसाठी पोळे, पत्रादेवीला हंगामी प्रयोगशाळा

आयात मासळी तपासणीसाठी पोळे, पत्रादेवीला हंगामी प्रयोगशाळा

Published On: May 30 2019 1:33AM | Last Updated: May 30 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

परराज्यातून आयात होणार्‍या मासळीची शास्त्रीयरीत्या तपासणी करण्यासाठी राज्याच्या सीमेवरील दोन चेकपोटस्टवर ‘क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सहाय्याने हंगामी प्रयोगशाळा स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. राज्यातील पोळे व पत्रादेवी तपासणी नाक्यावर या हंगामी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

राज्यात 1 जूनपासून सुरू होणार्‍या 60 दिवसांच्या मासेमारी बंदीच्या  कालावधीत  आणि त्यानंतरही अन्य राज्यातून मासळी आयातीवर बंदी  घालण्याबाबत नव्याने विचार केला जाणार आहे. मासेमारी बंदी काळात   गोमंतकीयांना परराज्यातून आयात केल्या जाणार्‍या मासळीवर अवलंबून रहावे लागणार आहे. गतवर्षी मासळी बंदीच्या कालावधीनंतर आयात झालेल्या मासळीत ‘फॉर्मेलिन’ हे घातक रसायन आढळल्यामुळे राज्यभर मोठा गोंधळ उडला होता. राज्यात मासळी मिळत नसल्याने परराज्यातून ‘फॉर्मेलिन’मुक्त मासळी  उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कडक निर्बध घालण्यात आले होते. 

हे निर्बंध अजूनही लागू आहेत. आयात मासळीची राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर आरोग्य खात्याचे अधिकारी कधीही  तपासणी करीत असले तरी त्यांना उघड्यावर अथवा चेकपोस्टवरील एखाद्या शेडमध्ये तपासणी करावी लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी राज्यातील पोळे आणि पत्रादेवी या दोन चेकपोस्टवर आयात मासळीची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी एक तात्पुरती प्रयोगशाळा स्थापन करण्यास राज्य सरकारच्या वित्तीय खात्याने मान्यता दिली आहे. मासळी तपासणीसाठी राज्य पोलिस दलाची आणि वाहतूक खात्याचीही मदत घेतली जाणार आहे. या हंगामी प्रयोगशाळा येत्या दोन आठवड्यांत उभारल्या जाणार असल्याचे आरोग्य खात्याच्या  वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.