Wed, Jul 08, 2020 14:17होमपेज › Goa › टॅक्सीवादावर दोन दिवसांत तोडगा

टॅक्सीवादावर दोन दिवसांत तोडगा

Published On: Jul 30 2019 1:36AM | Last Updated: Jul 30 2019 1:36AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील टॅक्सी व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांशी आपण चर्चा केली असून, याविषयी विधानसभेत एक तास सर्व सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेणार आहे. या समस्येवर येत्या दोन दिवसांत सर्वमान्य तोडगा निघेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिले. 

पर्वरी येथील विधानसभा संकुलात मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खासगी टॅक्सी चालक, ‘गोवा माईल्स’ चालक व अधिकार्‍यांची सोमवारी संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, टॅक्सी व्यवसायासंबंधी प्रश्न सध्या रेंगाळत आहे. या विषयावरील सर्व संबंधित घटकांशी आम्ही चर्चा केली आहे. याविषयी येत्या बुधवारी पुन्हा अर्ध्या तासासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत टॅक्सी वादावर यशस्वी तोडगा काढला जाणार आहे. 

मंत्री लोबो म्हणाले की, टॅक्सी वादावरील काही पर्याय मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर ठेवण्यात आले असून या पर्यायामुळे सदर समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. पर्यटक टॅक्सी चालकांना चांगला तोडगा मिळेल, अशी आशा आहे.दरम्यान, राज्य सरकार गोवा माईल्स अ‍ॅप बेस्ड् टॅक्सीसेवा चालवण्यावर ठाम आहे. ही सेवा बंद केली जाणार नाही, अशीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 

आंदोलन लांबणीवर : चेतन कामत

अखिल गोवा पर्यटक टॅक्सीचालक संघटनेचे नेते चेतन कामत म्हणाले की, संघटनेने सोमवारी चर्चेत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर मंगळवारपासून (दि. 30) राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, सोमवारची मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली बैठक समाधानकारक झाली असून सावंत यांनी दोन दिवसांत या विषयावर तोडगा निघणार असल्याचे सांगितले आहे. या आश्वासनावर विश्वासून आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.