Wed, May 27, 2020 17:23होमपेज › Goa › रायबंदर येथे तलवार हल्ल्यात एकजण गंभीर; संशयित फरार

रायबंदर येथे तलवार हल्ल्यात एकजण गंभीर; संशयित फरार

Published On: Jul 09 2019 1:12AM | Last Updated: Jul 09 2019 12:09AM
पणजी : प्रतिनिधी

रायबंदर येथे रविवारी रात्री उशिरा दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी झालेल्या तलवार हल्ल्यात एकाचा हाताचा पंजा तुटला असून हल्ल्याप्रकरणी जॅक, गौरिश, कमलेश (सर्व रा. नागाळी ताळगाव) व मनीष (रा. चोडण) या चार संशयितांविरुद्ध जुने गोवे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. चारही संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तलवार हल्ल्यात हाताचा पंजा तुटलेल्या कृष्णा कुट्टीकर याला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

जुने गोव्याचे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर हल्‍ला रविवार दि. 7 जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. ताळगाव येथील एकनाथ जानू गावस यांच्यावर वरील संशयितांच्या गटाने पूर्ववैमन्यस्यातून रात्री 9.30 वाजता हल्‍ला केला. या हल्ल्यानंतर गावस यांचे मित्र दिलीप काणकोणकर व कृष्णा कुट्टीकर (दोघे नागाळी, ताळगाव) हे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रायबंदरच्या दिशेने गेले. रायबंदर जंक्शन येथे त्यांनी हल्‍लेखोरांची दुचाकी पाहिली. 

सदर दुचाकी पाहिल्यानंतर गावस यांचे मित्र दिलीप काणकोणकर व कृष्णा कुट्टीकर तेथे गेले व त्यांनी हल्लेखोरांना गावस यांच्यावर का हल्ला केला, अशी विचारणा केली. त्यावर हल्‍लेखोरांनी त्यांच्यावर दगड व तलवारीने हल्ला केला. सदर हल्‍ला इतका भीषण होता की यात कृष्णा कुट्टीकर यांचा पंजा कापला जाऊन हातापासून वेगळा झाला. दरम्यान, कुट्टीकर यांच्यावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांत खुनाचा प्रयत्न, असा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे निरीक्षक दळवी यांनी सांगितले.गावस यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकात स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ताळगाव येथील गावस यांच्यावरील तसेच काणकोणकर व कुट्टीकर यांच्यावरील या हल्ल्याच्या दोन वेगळवेगळ्या प्रकरणांचा तपास पणजी व जुने गोवे पोलिस स्वतंत्रपणे करीत आहेत.