Thu, Jul 02, 2020 14:08होमपेज › Goa › विनयभंग प्रकरणी जलतरण प्रशिक्षकाला दिल्लीत अटक

विनयभंग प्रकरणी जलतरण प्रशिक्षकाला दिल्लीत अटक

Published On: Sep 07 2019 2:02AM | Last Updated: Sep 07 2019 2:02AM
म्हापसा : प्रतिनिधी

प. बंगाल येथील 15 वर्षीय अल्पवयीन जलतरणपटूचा विनयभंग केल्याप्रकरणी जलतरण प्रशिक्षक सुरजीत गांगुली याला दिल्लीतील काश्मिरा गेट भागात म्हापसा पोलिसांच्या सूचनेवरून दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. त्याला लवकरच म्हापसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

म्हापसा पोलिसांत गुरुवारी भा. द. सं. च्या 354, 376, 451 व 506 (2) तसेच बाल कायदा कलम नं. 8 व पोक्सो कलम 378 खाली प्रशिक्षकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. उत्तर अधीक्षक उत्क्रिष्ट प्रसूून, उपअधीक्षक गजानन देसाई यांनी निरीक्षक कपील नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथके तयार करून फरारी संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू केले.

संशयित गांगुलीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा माग काढत शोध घेतला असता तो अनेक ठिकाणी जात असल्याचे दिसून आले. शेवटी दिल्ली येथील काश्मिरा गेट परिसरात तो असल्याचे लक्षात येताच दिल्ली पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी मोठ्या शिताफीने सुरजीत गांगुली यास पकडून अटक केली. त्याला म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पुढील चौकशी सुरू होईल. 24 तासांच्या आत फरारी संशयिताला अटक केल्याबद्दल म्हापसा पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गुन्हा नोंद झाल्यावर संशयित सुरजीत गांगुली याला नोकरीतून गुरुवारी बडतर्फ करण्यात आले होते.