Mon, May 25, 2020 06:57होमपेज › Goa › कवळेकरांसह चौघांचा आज शपथविधी

कवळेकरांसह चौघांचा आज शपथविधी

Published On: Jul 12 2019 1:46AM | Last Updated: Jul 12 2019 1:46AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केलेले चंद्रकांत (बाबू) कवळेकर, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज तसेच उपसभापती मायकल लोबो अशा चौघांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आणि अपक्ष रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. नव्या मंत्र्यांचा शुक्रवारी रात्री अथवा शनिवारी सकाळी शपथविधी होणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली नऊ आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने विलीनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली आहे. दिल्लीला गेलेले सगळे नेते शुक्रवारी सकाळी राज्यात परतणार आहेत. त्यानंतर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 

 दरम्यान, दिल्लीला बुधवारी रात्री गेलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या काँग्रेसच्या 10 आमदारांसह गुरुवारी सकाळी भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. नड्डा यांनी सर्व दहाही भाजप आमदारांना पुष्प देऊन आणि भगवी शाल घालून अधिकृतपणे पक्षात प्रवेश दिला. नड्डा यांनी सर्व नव्या सदस्यांना शुभेच्छा देऊन राज्याच्या कल्याणासाठी सक्रिय राहण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मंत्रिपद देण्यासाठी विनोद पालयेकर यांनी मंत्रिपद सोडावे, असा प्रस्ताव अगोदर भाजपने गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना दिला होता. तथापी, जयेश साळगावकर, पालयेकर व सरदेसाई हे संघटित राहीले व त्यांनी या प्रस्तावाला अनुकूलता दाखवली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आमदार बाबूश मोन्सेरातच सूत्रधार 
काँग्रेसच्या दहा आमदारांच्या भाजपमधील प्रवेशनाट्यामागे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मोन्सेरात यांनी काँग्रेसचे दहा आमदार भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचे भाजपचे संघटन सचिव सतीश धोंड यांना गेल्या आठवड्यात कळविले होते. त्याआधी इंग्लंडमध्ये विजय सरदेसाई यांच्यासह क्रिकेट सामना पाहायला जाताना मोन्सेरात यांनी आपण सगळे मिळून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आणूया, असे विजय सरदेसाई यांना सांगितले होते. मगो पक्षाची जी स्थिती झाली, तीच गोवा फॉरवर्डचीही होईल, त्याआधीच आम्ही काँग्रेसचे सरकार आणूया, असे बाबूशने सरदेसाईंना सांगितले होते. सरदेसाई यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला नव्हता. बाबूशने शेवटी धोंड, तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व उपसभापती मायकल लोबो यांच्याशी चर्चा करून भाजप प्रवेशाची योजना प्रत्यक्षात आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

युती पक्षाबद्दल आज निर्णय : मुख्यमंत्री सावंत
दिल्ली भेटीविषयी माहिती देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले, की आपण आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संध्याकाळी स्वतंत्रपणे भेट घेऊन राजकीय परिस्थिती त्यांना सांगितली. त्यानंतर दहा आमदारांची शहा यांच्याशी भेट घडवण्यात आली. राज्यात शुक्रवारी संध्याकाळी परतल्यानंतर भाजपच्या कोअर गटाशी चर्चा करूनच युती पक्षातील नेत्यांबद्दल काय भूमिका घ्यावी, याचा निर्णय घेतला जाणार आहे.