Thu, Jul 02, 2020 14:07होमपेज › Goa › क्षेत्र वनाधिकारी फर्नांडिस निलंबित

क्षेत्र वनाधिकारी फर्नांडिस निलंबित

Published On: Jun 14 2019 1:52AM | Last Updated: Jun 14 2019 1:52AM
मडगाव : प्रतिनिधी

वेर्ले गावातील पडलावाडा येथे पोफळीची नासधूस केल्याच्या प्रकरणात अडकलेले नेत्रावळी राखीव वन क्षेत्राचे वनाधिकारी जॉन फर्नांडिस यांना निलंबित करण्याचा आदेश अखेर गुरुवारी जारी झाला. अखिल गोवा भूमिपुत्र संरक्षण मंचने जॉन फर्नांडिस यांच्या निलंबनाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.

वेर्लेत 20 मे रोजी पोफळीच्या कत्तलीची घटना घडली होती. नेत्रावळी राखीव वनक्षेत्रात येणार्‍या वेर्ले येथील पडलवाडा भागात स्थानिक शेतकर्‍यांनी लावलेली पोफळीची सुमारे चारशे झाडे अज्ञातांनी तोडली होती. या झाडांची नासधूस करणारे वन खात्याचे कर्मचारी आहेत, असा आरोप लोकांनी केला होता. स्थानिक लोकांनी या प्रकाराविरुद्ध आंदोलन छेडले होते. नेत्रावळी गेट जवळ साखळी आंदोलन छेडण्यात आले होते. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, सांगे आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी केली होती. स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकारात लक्ष घातले होते.लोकांनी या कृतीला वनाधिकारी जॉन फर्नांडिस हेच जबाबदार आहेत, असा आरोप केला होता. चौकशीनंतर प्रधान मुख्य वन वनपाल संतोष कुमार (आयएफएस) यांनी गुरुवारी जॉन फर्नांडिस यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जॉन यांनी पुढील आदेश येईपर्यंत वन खात्याच्या मुख्यालयात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे.

या आदेशाचे वेर्ले येथील शेतकरी तसेच अखिल गोवा भूमिपुत्र संरक्षण मंचाने स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी ट्विट करून आपण लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे म्हटले आहे.