Mon, May 25, 2020 09:37होमपेज › Goa › संशयितांच्या दारावरही ‘विलगीकरण’चे स्टीकर

संशयितांच्या दारावरही ‘विलगीकरण’चे स्टीकर

Last Updated: Mar 31 2020 10:46PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

‘कोरोनाव्हायरस’संदर्भात घरातच ‘विलगीकरणा’त राहण्यास सांगण्यात आलेल्या संशयितांच्या दारावरही ‘विलगीकरण’चे स्टीकर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, राज्यात कुणालाही घरातच ‘विलगीकरण’ करण्यास सांगितले याचा अर्थ सदर व्यक्ती ‘कोरोना’बाधित असल्याचा चुकीचा अर्थ लोकांनी घेऊ नये. अशा व्यक्तीला वेगळी वागणूक देण्याची सरकारची इच्छा नसली तरी जनजागृती होण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावरील पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील भुसारी आणि पशुखाद्य विक्री करणार्‍या घाऊक आणि किरकोळ व्यापार्‍यांशी आपण मंगळवारी चर्चा केली असून सर्व व्यवस्था नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. राज्यात काही भुसारी दुकानात डाळ मिळत नसल्याने आपण मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढणार आहे. सदर आवश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना सरकारी पासेस आणि परवानगीचीही गरज नसून फक्त या गाड्यांवर ‘अत्यावश्यक वस्तूंची सेवा’ असे स्टीकर लावले गेले तर त्या कोणीही अडवू नये, असे पोलिसांना व सरकारी अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे.

राज्याच्या सीमेवरून मंगळवारी 88 ट्रकांना प्रवेश देण्यात आला असून त्यात औषधे घेऊन येणार्‍या 55 आणि भाजीपाला, फळे, भुसारी आदी सामान घेऊन आलेले 25 ट्रक होते. जीवनावश्यक वस्तू घेऊन आलेल्या कुठल्याही ट्रकांना अडवण्यात आलेले नाही. राज्यातील सर्व खासगी इस्पितळांतील ‘ओपीडी’ व अन्य विभाग नित्यनियमाने सुरू ठेवण्यास सांगितले गेले आहे. ‘कोविड’ इस्पितळातील डॉक्टर आणि अन्य कर्मचार्‍यांशी आपण ‘व्हीडिओ कॉन्फरसिंग’द्वारे संपर्क साधला असून त्यांच्या काही समस्या जाणून घेतल्या असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 

राज्यातील सर्व सार्वजनिक जागा, मार्केट, शौचालय आदी ठिकाणांचे ‘सॅनिटायझेशन’ आणि स्वच्छता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, पालिका संचालनालय, एफडीए आदींच्या अधिकार्‍यांसोबत आपण चर्चा केली आहे. कोरोनाबाबतीत राज्य सरकारचा लढा संघटितपणे सुरू असून त्यात अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळत आहे. राज्यातील खाण मालकांकडून गोळा केल्या जात असलेल्या ‘गोवा लोह खनिज कायमस्वरूपी निधी’त सुमारे 400 कोटी असून त्यातील सुमारे 30 टक्के, म्हणजे 120 कोटी रुपयांचा वापर ‘कोरोना’च्या लढ्यासाठी केला जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

खलाशांचा प्रश्‍न सोडविणार : मुख्यमंत्री

जगाच्या पाठीवर विविध बोटी आणि क्रुजवर खलाशी म्हणून काम करत असलेले सुमारे 7 ते 8 हजार गोमंतकीय वेगेवगेळ्या देशांत अडकले आहेत. हा विषय केंद्रीय गृह मंत्रालय आणि अनिवासी भारतीय आयोगाच्या सहाय्याने सोडवला जाणार आहे. यासाठी चर्चिल आलेमाव, रेजिनाल्ड आलेक्स लॉरेन्स आदी आमदारांची तसेच खलाशी संघटनेची मतेही विचारात घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.