Wed, Jul 08, 2020 12:27होमपेज › Goa › ‘न्यूड पार्टी’ संबंधित संशयिताचे राजकारण्यांशी साटेलोटे

‘न्यूड पार्टी’ संबंधित संशयिताचे राजकारण्यांशी साटेलोटे

Published On: Oct 02 2019 1:37AM | Last Updated: Oct 03 2019 2:08AM
पणजी : प्रतिनिधी

सोशल मीडियावर न्यूड पार्टीचे पोस्टर झळकल्याने राज्यातील महिलांचा अपमान झालेला आहे. या संदर्भात अटक करण्यात आलेला संशयित अरमान मेहता याचे पेडण्यातील एका सत्ताधारी राजकारण्यासोबत साटेलोटे आहे, असा दावा करून गोवा सुरक्षा मंचचे पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सदर राजकारण्याचा शोध घेऊन त्याला पाठीशी न घालता कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. 

वेलिंगकर म्हणाले, राज्यात सुरू असलेले सत्तेसाठीचे राजकारण भावी पिढ्यांसाठी फार धोकादायक आहे. सरकारच्या कॅसिनो निष्ठेपायी अमली पदार्थ व वेश्या व्यवसायाचा फैलाव वाढत आहे. राज्याच्या शालीन, सोज्वळ प्रतिमेवर पर्यटनाच्या आडून आक्रमण केले जात आहे. कॅसिनो, वेश्या व्यवसायामुळे राज्याची प्रतिमा मलिन केली जात आहे. राज्य सरकारने लोकशाही तसेच राज्याच्या संस्कृतीवर अनैतिक आक्रमण केले असून याचा गोवा सुरक्षा मंच निषेध करतो, असे वेलिंगकर यांनी सांगितले. 

राज्यात अमली पदार्थ विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात पोचले आहेत हे सत्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात साखळी येथील महाविद्यालय, कुडचिरे, डिचोली भागातील विद्यालयांमध्ये अमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोचले असून या भागातील विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत. सरकारला याची संपूर्ण जाणीव असून सरकारचा ड्रग्ज माफियांना पाठिंबा मिळत असल्यानेच ड्रग्ज व्यवहार फोफावत आहे, असा आरोप वेलिंगकर यांनी केला. 

राज्य सरकारने रस्ते दुरुस्तीसाठी गणेश चतुर्थी, 28 सप्टेंबरपर्यंत अशा मुदती संपलेल्या आहेत. नागरिकांना प्राणघातक खड्ड्यांपासून सरकारने दिवाळीपर्यंत मुक्ती न दिल्यास गोसुमं राज्यभर सरकारविरोधात तीव्र निदर्शने करणार, असा इशारादेखील वेलिंगकर यांनी दिला.
पत्रकार परिषदेत अध्यक्ष आत्माराम गावकर, उपाध्यक्ष गोविंद देव, संदीप पाळणी व रोशन सामंत आदी उपस्थित होते.