Mon, May 25, 2020 04:13होमपेज › Goa › राज्यात पर्रीकरांमुळे मजबूत संघटन

राज्यात पर्रीकरांमुळे मजबूत संघटन

Published On: Mar 21 2019 12:57AM | Last Updated: Mar 20 2019 11:13PM
पणजी :  प्रतिनिधी

गोवा राज्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मजबूत संघटन केले. तसेच राज्यात 24 तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेच्या सभागृहात शोकप्रकट प्रस्तावावर चर्चा करताना दिली. डिचोलीचे आमदार राजेश पाटेकर यांनी माजी मुख्यमंत्री पर्रीकर, माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा तसेच माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी  सभागृहात शोकप्रकट प्रस्ताव मांडला होता.

उपमुख्यमंत्री ढवळीकर म्हणाले, पर्रीकर यांनी मजबूत संघटना  बांधली.  आपण जेव्हा पहिल्यांदा आमदार बनलो, तेव्हा त्यांनी  विधानसभेचे सर्व नियम व कायद्यांचा अभ्यास करावा,  असे सांगितले होते. त्यांनी विविध भागांना जोडणारे पूल उभारण्याबरोबरच विकास प्रकल्पांना देखील प्राधान्य दिले. राज्यातील सर्व गावांना 24 तास पाणी पुरवठा  व्हावा, असा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयाची प्रत्यक्षात अमलबजावणी करुन त्यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाल्यास पर्रीकरांना खरी श्रध्दांजली ठरेल. नव्या जुवारी पूला संदर्भात त्यांनी दिल्लीतील केंद्र सरकारकडे  24 बैठका घेतल्या. नव्या जुवारी पुलाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असून  हा प्रस्ताव  मंजूरीसाठी केंद्राकडे पाठवला जाईल.माजी उपमुख्यमंत्री डिसोझा व उपसभापती  वाघ यांच्या निधनावरही यावेळी ढवळीकर यांनी शोक व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, मनोहर पर्रीकर यांचा प्रवास हा कार्यकर्ता ते जननेता असा आहे.  आपण आमदार, सभापती ते मुख्यमंत्री हे केवळ पर्रीकर यांच्यामुळे घडलो. त्यांचे स्वप्न आपण नक्की पूर्ण करणार, असे म्हणत ते यावेळी भावूक झाले.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, की मनोहर पर्रीकर यांची उणीव भासणार आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधी पक्षनेता अशी त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. त्यांची प्रत्येक विषयावर मजबूत पकड होती. सर्व युतीच्या पक्षांना एकत्र घेऊन काम कसे करायचे, सरकार कसे पुढे घेऊन जायचे हे त्यांनी दाखवून दिले.

माजी उपमुख्यमंत्री डिसोझा हे एक उत्कृष्ट नेता होते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते.माजी उपसभापती वाघ हे एक अष्टपैलू  व्यक्तिमत्व होते. त्यांचे भाषेवर प्रभूत्व होते. बहुजन समाजाचा नेता अशी त्यांची ओळख होती.

उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या जाण्याने राजकारण बदलले आहे.त्यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळाली. पर्रीकर जेव्हा मुंबईत उपचार घेत होते, तेव्हा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगत, अशा प्रकारचा रुग्ण कधी पाहिला नाही.  आजारपणाशी झुंज देत असताना देखील त्यांच्या चेहर्‍यावर नेहमीच स्मित हास्य असायचे. आधुनिक गोव्याचे ते शिल्पकार होते, असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांनाही श्रध्दांजली वाहिली.मंत्री गोविंद गावडे, बाबू आजगावकर, हंगामी सभापती  मायकल लोबो व आमदार चर्चिल आलेमाव यांनीही श्रध्दांजली वाहिली. 

कला अकादमीच्या कला दालनास विष्णू वाघांचे नाव द्यावे : लोबो

माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांचे नाव  कला अकादमीच्या कला दालनाला द्यावे. त्याचबरोबर  माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे नाव म्हापसा येथे उभारण्यात येणार्‍या नव्या बसस्थानकाला द्यावे, अशी मागणी हंगामी सभापती मायकल लोबो यांनी केली.

मनोहर पर्रीकर यांच्यामुळे भाजप पक्ष सक्षम बनला. पर्रीकर यांच्यासारखा भाजपमध्ये दुसरा मुख्यमंत्री होणे नाही. पर्रीकर यांचा अधिकार्‍यांवर एकप्रकारचा दबदबा होता. त्यांच्याकडे नेतृत्व गुण  होते. केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी  आजारपणाशी झुंज दिली असे त्यांनी  सांगितले.
-चर्चिल आलेमाव, आमदार.