Wed, May 27, 2020 18:46होमपेज › Goa › राज्याचे उद्योजकता धोरण बनवणार : मंत्री विश्‍वजित राणे

राज्याचे उद्योजकता धोरण बनवणार : मंत्री विश्‍वजित राणे

Last Updated: Jan 11 2020 2:01AM
पणजी: प्रतिनिधी
राज्यातील युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता स्वत: उद्योजक बनून अन्य लोकांना रोजगार देण्यासाठी राज्याचे ‘उद्योजकता धोरण’ तयार केले जाणार आहे. यासाठी ‘आयटीआय’ प्रशिक्षित युवकांना राज्यातील उद्योग जगतात सामील करून घेण्यासाठी विविध उद्योजक- व्यावसायिकांसोबत चर्चा, बैठका सुरू असल्याचे उद्योग आणि कौशल्य विकास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. 
येथील कला अकादमी सभागृहात कौशल्य विकास व उद्योजकता विकास तसेच गोवा आयटीआय खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कौशल्य जागरूकता’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मंत्री राणे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना रोजगार मिळावा,यासाठी त्यांना नविन तांत्रिक कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगारासंबंधीच्या धोरणात   बदल करण्याचे योजले आहे. राज्यात कुठल्याही सरकारच्या कालावधीत फक्त 4 ते 5 हजार युवकांना सरकारी मिळणे शक्य आहे. त्यामुळे स्वंयरोजगार हाच उत्तम पर्याय कमी शिकलेल्यांसाठी असून त्यांनी उद्योगाला कौशल्याची जोड देणे आवश्यक आहे.  राज्यात येणारे उद्योग जर स्थिरावले तर युवकांना रोजगार प्राप्त होणे सोपे होणार आहे. 

खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी   सांगितले, की युवकांच्या सोयीसाठी आयटीआय खात्याच्या राज्यात तीन ठिकाणी नवे कार्यालय स्थापले जाणार आहे. तसेच आयटीआय अभ्यासक्रमात विजेवर चालणारे वाहन , ‘ड्रोन’ आदी बांधण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

गोवा लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदार कोचकर म्हणाले, की सरकारी आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक युवक उद्योग - व्यवसायाकडे नोकर्‍या मागण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्याकडे राज्यातील उद्योगांशी लागणारे तंत्रज्ञान व अनुभवाची वानवा जाणवते. यासाठी सर्व आयटीआय आणि उद्योजकांमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी दोन्ही बाजूनी विचाराचे आदानप्रदान केल्यास आयटीआय उत्तीर्ण  युवकांना रोजगारात सामावून घेणे शक्य होणार आहे. 

यावेळी व्यासपिठावर खात्याचे सचिव सी. आर. गर्ग, प्रवीण कोल्लर आदी मान्यवर उपस्थित होते. आयटीआय क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना व प्राचार्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

कौशल्य‘ऑलिम्पिक’साठी राज्यातून 1056 स्पर्धक
कौशल्य विकास क्षेत्रातील ‘ऑलिम्पिक’ मानले जात असलेल्या जागतिक कौशल्य अजिंक्यपद  स्पर्धा सप्टेंबर-2021 मध्ये शांघायमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील अनेक संस्था व युवकांनी पहिल्यांदाच भाग घेतला असून आतापर्यंत 1056 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार असून 15 जानेवारी ही अंतिम मुदत असल्याचे सांगण्यात आले आहे.