Mon, Sep 16, 2019 12:37होमपेज › Goa › राज्य सरकारनेही गॅस सिलिंडरवर अनुदान द्यावे

राज्य सरकारनेही गॅस सिलिंडरवर अनुदान द्यावे

Published On: Oct 13 2018 1:15AM | Last Updated: Oct 13 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

एलपीजी गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने  गृहिणींचे  आर्थिक  बजेट बिघडू लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही गॅस सिलिंडरवर अनुदान द्यावे. येत्या सात दिवसांत या संदर्भात निर्णय न झाल्यास प्रदेश महिला काँग्रेस रस्त्यावर उतरणार, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष  प्रतिमा कुतिन्हो यांनी पणजी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचार घेत  असल्याने  ते  बरेच दिवस  राज्यात अनुपस्थित आहेत. पर्रीकर यांनी  आता  आपल्या पदाचा राजीनामा देऊन आराम करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कुतिन्हो म्हणाल्या, की जुलै महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 700 रुपयांवरुन वाढून ते ऑक्टोबर महिन्यात 900 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.  गॅस सिलिंडर ही श्रीमंतांपासून ते गरीबांपर्यंत प्रत्येकाचीच गरज आहेत.  मात्र, वाढती महागाई व गॅस सिलिंडरचे दर लक्षात घेता गृहिणींचे आर्थिक  बजेट बिघडू लागले आहे. एका बाजूने केंद्र सरकार जनतेला सिंलिंडरवरील अनुदानसोडण्याचे आवाहन करते व दुसरीकडे  सिलिंडरच्या दरात वाढ करीत असल्याची टीका त्यांनी केला.

काँग्रेस सरकारच्या काळात किंचित महागाई वाढली की आंदोलन करणार्‍या भाजप महिला मोर्चाच्या सदस्या आता गप्प का आहेत, आता त्या का या विरोधात आवाज उठवत नाही, महिला मोर्चा आता कुठे आहेत असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले.

मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी अनेक दिवसांपासून राज्याबाहेर आहेत. राज्यात अनेक समस्या आहेत. परंतु त्याकडे कुणीच लक्ष देत नाहीत. जनतेला सुशासन हवे आ हे. जनतेने दिलेला कौल नाकारुन भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, जनतेला सुशासन देण्यात त्यांना अपयश आले आहे. वाढती महागाई लक्षात घेता सरकारने जनतेला गॅस सिलिंडर स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली, प्रदेश महिला काँग्रेसच्या बीना नाईक, प्रतिभा बोरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.