Fri, May 29, 2020 23:13होमपेज › Goa › राज्याचा १९ हजार कोटींचा अर्थसंकल्प

राज्याचा १९ हजार कोटींचा अर्थसंकल्प

Published On: Jan 31 2019 1:30AM | Last Updated: Jan 30 2019 11:26PM
पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 19 हजार 548 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गतसालच्या  तुलनेत यंदा 14.16 टक्के वाढ दाखवण्यात आली आहे. शिक्षण व कृषी  क्षेत्रावर अधिक भर असलेल्या या अर्थसंकल्पात आयटी, रोजगार, साधनसुविधा, आरोग्य आणि एकदंर आर्थिक विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. 1200 कोटी रुपयांची वित्तीय तूट असली तरी, 455.10 कोटी रुपयांचा हा शिलकी अर्थसंकल्प आहे. पूर्ण दर्जाचा अर्थसंकल्प नसल्याने नवे कोणताही कर प्रस्ताव नाहीत, अथवा योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. पुढील पाच महिन्यांच्या लेखानुदानाला आणि विनियोग विधेयक-2019 लाही  सभागृहाने बुधवारी मंजुरी दिली.

भाजप आघाडीचे सरकार 2017 साली स्थापन केल्यानंतर अर्थमंत्री म्हणून पर्रीकर यांनी यंदा तिसर्‍यांदा अर्थसंकल्प मांडला. आजारी असल्याने दोन ‘मार्शल’च्या साहाय्याने सभागृहात दाखल झालेले पर्रीकर यांनी आसनावर  बसूनच अर्थसंकल्प सुमारे पाच मिनिटात वाचून दाखवला. त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रत ‘टॅब्लेट’च्या माध्यमातून व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व विधानसभा सदस्यांना दिली जाईल, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. पर्रीकर यांचे वाचन झाल्यानंतर  संपूर्ण अर्थसंकल्प वाचला, असे गृहीत धरावे, असे सभापतींनी सांगितल्यावर सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात अर्थसंकल्पाला एकमुखी मान्यता दिली. 

वित्तमंत्री म्हणून पर्रीकर यांनी मांडलेला यंदाचा एकूण अर्थसंकल्प 19 हजार 548 कोटी रुपयांचा आहे. गतसालच्या  17 हजार 123 कोटी 28 लाख रुपयांचा तुलेनत  यंदा 14 टक्के वाढ दाखवण्यात आली आहे.  यंदा 2019-20 सालचे महसुली उत्पन्न 16 हजार 35 कोटी रुपये अपेक्षित असून गतसालच्या 13 हजार 664 कोटी रुपयांच्या तुलनेत 17.35 टक्के वाढ दाखवण्यात आली आहे. सतत सहाव्यांदा  शिलकी अर्थसंकल्प सादर करताना यंदा  455.10 कोटींचे शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारला केंद्राच्या करातील वाटा (3336.47 कोटी) धरून 9 हजार 39 कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. गतसाली एकूण कराद्वारे 8257 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे अहवालातील आकडेवारीत  आढळून येते. 

अर्थ सचिव दौलत हवालदार यांनी अर्थसंकल्पाची काही वैशिष्ट्ये सभागृहाबाहेर उपस्थित पत्रकारांना सांगितली. हवालदार म्हणाले, की पुढील पाच महिन्यांसाठी लेखानुदान घेतले जाणार आहे. कर प्रस्ताव व योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला नसून केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर त्यासाठी स्वतंत्र तरतुदी केल्या जाणार आहेत. अर्थसंकल्पातील आकडेवारी म्हणजे अंदाज असून , अंदाजित खर्च व अंदाजित आर्थिक प्राप्ती अर्थसंकल्पात मांडली गेली आहे.

अखेरच्या श्‍वासापर्यंत गोव्याच्या सेवेत : पर्रीकरांचे भावोद्गार

अखेरचा श्‍वास असेर्पयत आपण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने गोव्याची सेवा करत राहणार आहे. गोमंतकीयांनी मला खूप प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. मातृभूमी गोवा आणि ‘गोंयकारपण’ला आपण नेहमी मान देणार आहे. अर्थसंकल्प मांडताना आपणाला पूर्ण‘जोश’ व ‘होश’ ही आहे. आपले बोलणे कमी झाले असले तरी अर्थसंकल्पात मांडलेले  ‘आकडे’ शब्दांपेक्षा अधिक बोलके आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अर्थसंकल्पीय भाषणाची सुरवात केली.

शिक्षण क्षेत्रासाठी 2240 कोटींची तरतूद

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. शालेय, माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी 2240 कोटींचा सर्वाधिक वाटा ठेवण्यात आला आहे.  आरोग्य व सामाजिक कल्याण क्षेत्रासाठी 2448 कोटी, कृषी 535 कोटी, सार्वजनिक बांधकाम व जलस्रोत क्षेत्रासाठी 3264, वीज खात्यासाठी 2440 कोटी, तसेच उद्योग, कामगार, रोजगारसाठी 234 कोटी, आयटी क्षेत्रासाठी 395 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.