होमपेज › Goa › मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज वा उद्या गोव्यात  

राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे   शुक्रवारी (दि. 15) गोव्यात आगमन होण्याची शक्यता असून  त्या दिवशी राज्य  मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व मंत्र्यांनी शुक्रवारी  राज्यात उपस्थित राहण्याची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे काही मंत्र्यांनी आपले राज्याबाहेरचे दौरे स्थगित अथवा त्यात बदल केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर शुक्रवारी राज्यात परतणार असल्याची माहिती आमदार नीलेश काब्राल यांनी मंगळवारी दिली. 

पर्रीकर अमेरिकेत 16 मार्चपासून  उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या तीन महिन्यांत गोव्यात मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली नाही. काही प्रस्ताव तेवढे त्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाच्या सदस्यांमध्ये फिरवून (बाय सर्क्युलेशन) संमत केले गेले. मुख्यमंत्री पर्रीकर हे नक्‍की कधी राज्यात परतणार हे डॉक्टरांच्या परवानगीवर अवलंबून आहे. 

त्यामुळे पर्रीकर जर गुरुवारी  रात्री उशीरा गोव्यात दाखल झाले तर शुक्रवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, जर ते  15 जूनला सकाळी आले तर  त्याच दिवशी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी बहुतेक मंत्र्यांना फोन करून येत्या शुक्रवारी गोव्याबाहेर जाऊ नका, अशी सूचना केली  असून  मंत्रिमंडळाची 15 जूनला बैठक घेणार असल्याचीही कल्पना दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठीची पूर्वतयारी सध्या मुख्य सचिव धर्मेश शर्मा करीत आहेत. मंत्रिमंडळातील एक मंत्री देवदर्शनाला जाणार होते. मात्र मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहण्यासाठी गुरुवारी रात्रीच गोव्यात परतणार आहेत. आणखी  एक मंत्री दिल्लीची आपली भेट आटोपून तातडीने गुरुवारी रात्री राज्यात  परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह 

पर्रीकर सुमारे तीन  महिन्यानंतर गोव्यात परत येत असल्याने भाजप   सरकारच्या घटक पक्षातील  मंत्री व भाजप आमदारांनी आनंद व्यक्‍त केला आहे. भाजप कार्यकर्त्यांत  नवा उत्साहच संचारला आहे. पर्रीकर आल्यानंतर सुस्त असलेले प्रशासन   गतिशील होण्याची अपेक्षा काही मंत्र्यांनी व्यक्‍त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे प्रस्तावही संमत होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.