Wed, Jul 08, 2020 12:04होमपेज › Goa › गोमंतकीय चित्रपटांसाठी विशेष विभाग

गोमंतकीय चित्रपटांसाठी विशेष विभाग

Last Updated: Oct 17 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी
राज्यात नोव्हेंबर महिन्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोमंतकीय चित्रपटांसाठी विशेष विभाग असावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरावरून केली जात होती. याची दखल घेऊन अखेर आयोजकांकडून गोमंतकीय मराठी व कोकणी फिचर व नॉन फीचर चित्रपटांसाठी इफ्फीत विशेष स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इफ्फीसाठी चित्रपट पाठविण्यासाठीचा अर्ज गोवा मनोरंजन संस्था (इएसजी) तसेच इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर आहे. 

गोमंतकीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदर विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. चित्रपट पाठवायला अर्ज भरण्यासाठी काही अटी व नियम लागू करण्यात आले आहेत. फिचर विभागातील चित्रपट मराठी किंवा कोंकणी अशा दोनच भाषेत तर नॉन फिचर विभागात चित्रपट मराठी, कोंकणी, इंग्रजी व हिंदी भाषेत असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटाचे निर्माते गोमंतकीय असणे बंधनकारक आहे. 

चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटाला इंग्रजीत उपशीर्षके आवश्यक असून चित्रपटाचा हा प्रीमियर शो असावा. फिचर विभागातील चित्रपटांचा अवधी 70 मिनिटांहून जास्त असावा तर नॉन फिचर चित्रपट हा 10 मिनिटांपेक्षा अधिक आणि 70 मिनिटांहून कमी अवधीचा असणे आवश्यक आहे. एका निर्मात्या, प्रोडक्शन कंपनीकडून जास्तीत जास्त एकाच चित्रपटाला परवानगी असेल. 

चित्रपट निवड समिती तीन सदस्यांची आहे. या गोमंतकीय चित्रपटांच्या विशेष विभागासाठीचा अर्ज व चित्रपट पाठविण्याची संपूर्ण माहिती तसेच प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज व चित्रपटाचे साहित्य मनोरंजन संस्थेकडे 2 नोव्हेंबरच्या आधी सादर करावे. 2 नोव्हेंबरच्या नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. 

दरम्यान, इफ्फीत गोव्यातील एकही सिनेमा इंडियन पॅनोरमा विभागात निवडण्यात आला नसल्याने सर्वात आधी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी संताप व्यक्‍त केला होता. त्यानंतर इएसजीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनीदेखील गोमंतकीय चित्रपटांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पदाधिकार्‍यांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सोबत इफ्फीची आढावा बैठकदेखील घेतली. त्यानंतर बुधवारी (दि.16) इएसजीतर्फे गोमंतकीय चित्रपटांच्या विशेष विभागासाठी संकेतस्थळावरून अर्ज मागविण्यात आले. 

‘कंट्री फोकस’मध्ये यंदा रशिया

सुवर्ण महोत्सवी इफ्फी 2019 मध्ये यंदा रशिया हा देश कंट्री फोकस म्हणून निवडण्यात आला आहे. कंट्री फोकस या विशेष विभागात रशियातील सिनेमांचा प्रवास व उच्च दर्जाचे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. कंट्री फोकसच्या माध्यमातून रशियातील अनेक सिनेदिग्दर्शक, अभिनेते इफ्फीसाठी गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन व नामवंत गायिका आशा भोसले यांना निमंत्रित करण्याचा निर्णय दिल्ली येथे चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या स्तरावर झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.