Wed, May 27, 2020 18:08होमपेज › Goa › दक्षिण, उत्तर गोव्याचे खासदार कोण?

दक्षिण, उत्तर गोव्याचे खासदार कोण?

Published On: May 23 2019 1:41AM | Last Updated: May 23 2019 1:41AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील लोकसभेच्या  उत्तर व दक्षिण गोवा  अशा दोन निवडणुकांची आणि  चार  विधानसभा  मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी  निवडणूक आयोगाची यंत्रणा  सज्ज झाली आहे.  या मतमोजणीत दक्षिण गोवा, उत्तर गोव्याचे खासदारपद कोणाला मिळणार, तसेच पणजीसह शिरोडा, मांद्रे, म्हापसा या विधानसभा मतदारसंघांचे आमदार कोण होणार याचा निर्णय गुरुवारी होणार आहे.

गोव्याचे विद्यमान भाजप खासदार श्रीपाद नाईक आणि अ‍ॅड. नरेंद्र सावईकर आपल्या जागा राखण्यात यशस्वी होतात का याचा निर्णय आज लागणार आहे. त्यांना उत्तर गोव्यात चुरस निर्माण केलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि दक्षिण गोव्यात लढलेले माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दिलेल्या झुंजीचा निकालही आज लागणार आहे. 

राज्य विधानसभेच्या चार मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकाच्या निकालाबाबतची उत्कंठाही आज संपुष्टात येणार आहे. काँग्रेसचा त्याग करून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेले सुभाष शिरोडकर (शिरोडा) आणि दयानंद सोपटे (मांद्रे) यशस्वी होतात का, म्हापसा व पणजीचा गड अनुक्रमे जोशुआ डिसोझा व सिद्धार्थ कुंकळ्येकर राखण्यात यशस्वी होतात का, याचाही निर्णय आज लागणार असून शिरोड्यासाठी मगोपच्या दीपक ढवळीकरांनी केलेला अट्टाहास, काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात यांनी पणजी जिंकण्याचे दीर्घकाळ जपलेले स्वप्न आणि म्हापशात भाजपशी असलेले दीर्घकाळचे नाते तोडून काँग्रेसशी सुधीर कांदोळकरांनी केलेला घरोबा यशस्वी होतो का, याचाही निर्णय आज लागणार आहे. या पोटनिवडणुकाही उमेदवारांच्या पक्षबदलामुळे, त्यांच्यातील चुरशीमुळे लक्षवेधी ठरल्या आहेत.

मतमोजणीला सकाळी 8 वा. सुरुवात होईल. आल्तिनो येथील  तंत्रनिकेतन महाविद्यालयात  उत्तर गोवा लोकसभा ममदारसंघ तसेच मांद्रे,   म्हापसा व पणजी या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी होईल तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ तसेच शिरोडा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठीची मतमाजेणी  मडगाव-बोर्डा   येथील सरकारी मल्टिपर्पज महाविद्यालयात होईल.
मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा तैनात केली आहे. यात गोवा पोलिसांसह निमलष्करी दलाच्या जवानांचाही समावेश आहे.  

सकाळी 7 वाजता स्ट्रॉँग रूम उघडून इलेक्ट्रॉनिक  मतदान यंत्रे, मतमोजणी कक्षात आणली जातील. सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात होईल. प्रथम टपाली मते मोजली जातील. त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी सुरू होईल, उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर  मिळून  मोठ्या संख्येने कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्‍त केले आहेत.  मतमोजणी दोन  फेर्‍यांमध्ये होणार आहे. लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकांसाठी वेगळवेगळे टेबल्स असणार आहेत.  

उत्तर गोवा व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी इव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक  लोकसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिनमधील स्लिप मोजाव्या लागतील. ईव्हीएमवरील  मते व व्हीव्हीपॅट स्लीप यांचा मेळ बसल्यानंतरच अधिकृत निकाल जाहीर केला जाईल.

पणजी  पोटनिवडणूक ही  भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली असून  मांद्रे  म्हापसा व शिरोडा या  तीन  विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणुकीच्या निकालाकडे गोमंतकीयांचे लक्ष अधिक आहे. पोटनिवडणुकांच्या निकालाशी राज्य सरकारच्या स्थैर्याचा मुद्दा जोडला गेल्याने या निकालाबाबत राज्यात मोठी उत्सुकता आहे.

भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून लोकसभेप्रमाणेच चारही पोटनिवडणुकांमध्ये विजयाचा दावा केला जात आहे. 23 मे नंतर   राज्यात   काँग्रेसचे सरकार येणार  असल्याचा दावा काँग्रेसने पक्षाने केला आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकतेत भर पडली आहे. निवडुकीनंतर राजकीय स्थितीबाबतची चर्चाही रंगली आहे.

‘व्हीव्हीपॅट’ स्लिप मोजणीसाठी चिठ्ठ्यांद्वारे केंद्रांची निवड

ईव्हीएमवरील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर  मतदारसंघातील कुठल्याही पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जातील. ही पाच मतदानकेंद्रे चिठ्ठ्या टाकून निवडण्यात येतील. ईव्हीएमवरील मतमोजणी साधारपणे दोन तासांत पूर्ण होईल. परंतु त्यानंतर व्हीव्हीपॅट स्लिप मोजण्यासाठी आणखी पाच तास लागतील. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास विलंब होईल.