Mon, May 25, 2020 12:58होमपेज › Goa › दक्षिण गोवा हरित जिल्हा : मुख्यमंत्री

दक्षिण गोवा हरित जिल्हा : मुख्यमंत्री

Last Updated: Apr 14 2020 10:53PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, दक्षिण गोवा जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित  रुग्ण सापडला नसल्याने या जिल्ह्याला ‘हरित जिल्हा’  घोषित केले आहे. दक्षिण गोव्यात   कोरोनाचा एकच संशयित रुग्ण सापडला होता, मात्र त्याचा अहवाल नंतर ‘निगेटिव्ह’ आला होता. उत्तर गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण असल्याने तो ‘लाल जिल्हा’  जाहीर झाला आहे. उत्तर गोव्यात आता फक्त 2 कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहिले  असून हे रुग्ण बरे झाल्यास आणि येत्या 17 एप्रिलपर्यंत नवा  कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्यास उत्तर गोवा जिल्हाही  ‘हरित जिल्हा’ म्हणून घोषित होणे शक्य आहे. यामुळे, पूर्ण गोवा राज्य ‘हरित विभागा’त जाणार असल्याचा विश्‍वास  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री म्हणाले, की  विदेशात असलेल्या आणि बोटींवर अडकलेल्या खलाशांना राज्यात आणल्यावर त्यांना ‘विलगीकरण केंद्रात’ ठेवण्यासाठी आवश्यक सोयी तयार केल्या आहेत. राज्यात सुमारे 20 हजार लोकांना ‘विलगीकरण केंद्रात’ ठेवण्यासाठी हॉटेल, रिसोर्ट आदींचा शोध घेण्यात आला असून ‘महामारी कायद्या’खाली ही आस्थापने ताब्यात घेतली जाणार असल्याचे केंद्र सरकारला कळवण्यात आले आहे.