Mon, May 25, 2020 03:13होमपेज › Goa › ‘इफ्फी’त आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अवमानाबद्दल पुत्र सिद्धेश नाराज

‘इफ्फी’त आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अवमानाबद्दल पुत्र सिद्धेश नाराज

Published On: Nov 30 2018 1:25AM | Last Updated: Nov 30 2018 1:25AMपणजी : प्रतिनिधी

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) श्रीपाद नाईक यांना इफ्फीच्या समारोपावेळी व्यासपीठावर बोलविण्याचे सौजन्य आयोजकांनी दाखवले नसल्याबदद्ल  पुत्र सिद्धेश नाईक यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांना ट्विटर संदेश पाठवून आपला रोष त्यांनी व्यक्त  केला आहे. 

गोव्यात दरवर्षी इफ्फीचे आयोजन केले  जात  असून राज्यातील खासदार केंद्रात मंत्री असूनही त्यांना इफ्फीच्या कार्यक्रमात मान दिला जात नसल्याचे उघड झाले आहे. दरवेळी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप सोहऴ्यावेळी श्रीपाद नाईक यांची दखल आयोजक घेत नाही.

49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा बुधवारी  बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात पार पडला. देश-विदेशातील हजारो प्रतिनिधी आणि बरेच सिने कलाकार त्यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारामुळे गैरहजर होते. 

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे त्यावेळी प्रेक्षकांमध्ये होते. व्यासपीठावर अनेक महनीय व्यक्ती व विशेषत: राजकारण्यांना बोलावून त्यांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार प्रदान केले गेले. मात्र एकदाही श्रीपाद नाईक यांना व्यासपीठावर बोलविले गेले नसल्याने सभागृहात व सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. 

या विषयी नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश यांनी या अन्यायाविरुद्ध प्रथमच गुरुवारी आवाज उठवला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी  चित्रपट महोत्सव संचालनालयाला (डीएफएफ) शिष्टाचार शिकवावा, असा सल्ला सिद्धेश नाईक यांनी दिला आहे. सिद्धेश यांनी आपल्या भावना ट्वीटरवरूनही व्यक्त करताना नमूद केले आहे, की  ‘राठोड सर, प्लीज टीच प्रोटोकॉल टू युवर डीएफएफ इंडिया’ .डीएफएफला स्वत:च्या देशातील केंद्रीय मंत्री ठाऊक नाहीत . 

या प्रकरणासंबंधी सिद्धेश नाईक यांनी गुरुवारी सांगितले की, यापूर्वी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाच्या मंत्रीपदी स्मृती इराणी असतानाही श्रीपाद नाईक यांना इफ्फीवेळी व्यासपीठावर बोलाविले गेले नव्हते. एकदा चुकून झाले असे म्हणता येते पण दरवेळीच असे घडू लागल्याने आपल्याला आवाज उठवावा लागला. चित्रपट महोत्सव संचालनालयाला शिष्टाचार कळण्याची गरज आहे.