Thu, May 28, 2020 07:25होमपेज › Goa › अपना घरातून सहा मुलांचे पलायन 

अपना घरातून सहा मुलांचे पलायन 

Last Updated: Feb 20 2020 1:12AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 
मेरशी येथील अपना घरातून  पळून गेलेल्या सहा अल्पवयीन  मुलांना ताब्यात घेण्यात जुने गोवे पोलिसांना यश आले आहे. सर्व अल्पवयीन मुले ही मंगळवार दि. 18 रोजी संध्याकाळी  अपना घरातून पळून गेली होती.

तर त्यांना बुधवारी पहाटे पुन्हा ताब्यात घेण्यात आली. जुने गोवे येथील करमळी रेल्वेस्थानक तसेच कदंब पठारावरील  झाडाझुडपांमध्ये ही मुले लपून बसली होती, अशी माहिती पणजी उपधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली. 

उपअधीक्षक राऊत देसाई  म्हणाले, की मेरशी येथील अपना घरातून  सुमारे सहा अल्पवयीन मुले मंळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक  पळून  गेली. यापैकी पाच मुलांना  कळंगुट येथील एका  फसवणूकप्रकरणी कळंगुट पोलिसांनी  ताब्यात घेऊन त्यांची मेरशी येथील अपना घरात  रावानगी केली होती. तर अन्य एक देखील एका गुन्ह्याप्रकरणी अपना घरात आहे. मागील सहा महिन्यांपासून ही  सर्व मुले तिथेच होती.  पळून जाण्याचा कट त्यांचा पूर्वनियोजित होता. यासाठी त्यांनी तयारी म्हणून तळमजल्यावरील खिडकीचे ग्रिल्स वाकवून ठेवले होते.   या मुलांना अपना घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आले होते. पळून जाण्यासाठी  या मुलांनी  चादरीच्या साहाय्याने पहिल्या मजल्यावरून तळमजला गाठला व खिडकीतून पलायन  केल्याचे त्यांनी  सांगितले.

मुलांच्या पलायनाची कुणकुण अपना घर प्रशासनाला लागताच त्याची माहिती जुने गोवे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी  मेरशी, जुने गोवे तसेच आजूबाजूचा परिसर पिंजून काढून  त्यांचा शोध घेतला. यावेळी तीन मुले  कदंब पठारावर सुरू असलेल्या गेरा प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी आढळून आली. तर उर्वरीत तीन मुले  बुधवारी पहाटे  करमळी रेल्वेस्थानकावर आढळून आली.   रेल्वेने   मुंबईला पळून जाण्याच्या ते तयारीत होते. मात्र त्या पूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पुन्हा एकदा अपना घरात करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी अपना घरातून  अन्य एका अल्पवयीन  मुलाने पलायन केले होते. त्याला न्यायालयात नेत असताना तो पळून गेला.  अल्पवयीन  मुलांच्या पलायानच्या घटना घडू नये यासाठी  कुंपण घालणे,  सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, अपना घर परिसरात व्यवस्थित विजेची सोय असणे आवश्यक आहे. याबाबत पोलिस खात्याकडून  अपना घर प्रशासनाशी पत्रव्यवहार  केला जाणार असल्याचे उपअधीक्षक राऊत देसाई यांनी  सांगितले.