Sun, May 31, 2020 14:54होमपेज › Goa › भाजपकडून अखेर सिद्धार्थ कुंकळ्येकर 

भाजपकडून अखेर सिद्धार्थ कुंकळ्येकर 

Published On: Apr 29 2019 1:53AM | Last Updated: Apr 29 2019 1:11AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रविवारी संध्याकाळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची उमेदवारी भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नंदा यांच्याकडून जाहीर करण्यात आली. पणजीतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रतिष्ठितांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीतून हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पणजी गट मंडळ, नगरपालिका नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून मत जाणून घेऊन उत्पल पर्रीकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर ही दोन नावे दिल्लीस्थित केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असून त्याच्या पूर्वसंध्येला भाजपकडून पणजी पोटनिवडणुकीसाठी कुंकळ्येकर यांचे नाव घोषित करण्यात आले. 

पणजी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे सांताक्रुजचे माजी आमदार अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात हा बलाढ्य उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. गोसुमंतर्फे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर आणि ‘आप’तर्फे वाल्मिकी नाईक हे उमेदवार असून भाजप वगळता अन्य सर्व उमेदवारांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. निवडणुकीचा अनुभव असलेल्या या उमेदवारांसमोर उत्पल पर्रीकर हे नवखे आणि काहीसे अपरिचित ठरण्याच्या शक्यतेने भाजपने कुंकळ्येकर यांच्या बाजूने कौल दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्यात नुकतेच लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि विधानसभेच्या मांद्रे, म्हापसा आणि शिरोडा या तीन मतदारसंघात पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजी मतदारसंघाची जागा रिक्‍त झाल्याने येत्या 19 मे रोजी पणजी पोटनिवडणुकीचे मतदान घेतले जाणार आहे. यामुळे, आता सर्वांच्या नजरा पणजी पोटनिवडणुकीवर खिळल्या असून भाजपने गेली 25 वर्षे राखलेला पणजीचा गड अबाधित राखण्याचे आव्हान कुंकळ्येकर यांच्यासमोर असणार आहे. 

विरोधी उमेदवाराची पर्वा नाही : मोन्सेरात

आपल्यासमोर कुठलाही उमेदवार असला तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही ही पोटनिवडणूक गंभीरतेने लढवत आहोत. भाजपने अथवा अन्य कुठल्याही पक्षाने कुठलाही उमेदवार रिंगणात उतरवला तरी त्याच्याबरोबर लढण्याची आमची तयारी आहे. आपण प्रचारात आघाडी घेतली असून पणजीची जागा मिळवणारच, असा विश्‍वास बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्‍त केला. 

...तर ती पर्रीकरांना श्रद्धांजली ठरेल : कुंकळ्येकर 

पणजीत 2017 ची पुनरावृत्ती होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पणजीवासीयांनी पुन्हा एकदा आमदारकी दिली होती. 2015 च्या पोटनिवडणुकीत आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपल्याला विधानसभेत पाठवले होते. पर्रीकरांचे कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही सरसावलो असून 23 मे रोजीचा निकाल हा पणजीकरांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल, असे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.