Wed, Jul 08, 2020 12:34होमपेज › Goa › विकासामुळेच लोकांच्या राहणीमानात सुधारणा

विकासामुळेच लोकांच्या राहणीमानात सुधारणा

Published On: Jul 09 2019 1:12AM | Last Updated: Jul 08 2019 11:25PM
फोंडा :  प्रतिनिधी

जनतेच्या हितासाठी विकासकामे केली जातात. मात्र विकासकामे करताना जनतेचे सहकार्य आवश्यक असते, मुळात ना हरकत दाखले असल्यास विकासकामांना कोणतीच अडचण येत नाही.  विकासकामे झाली तर  लोकांचे राहणीमान उंचावते, असे  प्रतिपादन माजी  मंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले. 

कवळे ग्रामपंचायतीतर्फे प्रभाग क्रमांक सहा व सातमध्ये निश्‍चित केलेल्या विविध विकासकामांचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, उपसरपंच मनुजा नाईक, कवळेचे अन्य पंचायत सदस्य, वाडी तळावलीचे पंचायत सदस्य हर्षल तळावलीकर आदी उपस्थित होते. 

सुदिन ढवळीकर म्हणाले, की  मडकई मतदारसंघात शिल्लक असलेली  विकासकामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी  सर्वांनी  सहकार्य केले पाहिजे. लोकांच्या 
सहकार्या शिवाय विकास होत नाही. कवळे पंचायतीचे विकासकामावरुन    अभिनंदन केले. कवळे पंचायतक्षेत्रात मिनी मार्केटसाठी  प्रयत्न  सुरू असून जागा उपलब्ध झाली तर मार्केट साकारण्यात येईल. स्वयंसहाय्य गटाच्या पदार्थांसाठी तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांना हे मिनी मार्केट उपयुक्त ठरेल, असे  ढवळीकर यांनी सांगितले.  

चित्रा फडते म्हणाल्या, की आपल्या प्रभागाचा विकास करावायाचा असल्यास ना हरकत दाखले देऊन  सहकार्य केले पाहिजे. आपण मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली. त्यासाठी आमदार सुदिन ढवळीकर यांचे सहकार्य लाभले.  उर्वरित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित पंचायतींनी ना हरकत दाखले द्यावेत. ना हरकत दाखले मिळाल्याशिवाय विकासकामे हाती घेता येत नाहीत.

सरपंच  कवळेकर म्हणाले, की  फोंडा तालुक्यातील इतर पंचायतींपेक्षा कवळे पंचायतीत कचरा निर्मूलनासाठी प्रभावी कार्यवाही होत आहे.  सहकारी पंचायत सदस्य  तसेच आमदार सुदिन ढवळीकर यांच्यामुळे कवळे पंचायत क्षेत्रातील विकासकामे होत आहेत.  आगामी काळात पंचायतक्षेत्रातील अन्य विकासकामेही मार्गी लावली जातील. परंतु त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. 
उपसरपंच मनुजा नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  मनोज बोरकर यांनी सूत्रसंचालन केले.  श्‍वेता गावडे यांनी आभार मानले.