Mon, May 25, 2020 03:27होमपेज › Goa › राखी नाईक प्रभुदेसाई यांनी भरला उमेदवारी अर्ज

राखी नाईक प्रभुदेसाई यांनी भरला उमेदवारी अर्ज

Published On: Apr 04 2019 4:59PM | Last Updated: Apr 04 2019 4:52PM
मडगाव : प्रतिनिधी

दक्षिण गोव्यातून शिवसेनेच्या राखी नाईक प्रभुदेसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल केला असून दक्षिण गोव्यातील एकूण अर्जाची संख्या सहा झाली आहे. यात भाजपचे नरेंद्र सावईकर, काँग्रेसच्या वतीने फ्रांसिस सार्दीन, आप तर्फे एल्विस गोम्स, शिवसेनेच्या राखी प्रभुदेसाई, अपक्ष मयूर खणकोणकर आणि निज गोयंकार रेव्हल्युशनरी फ्रंटचे डॉ. कालिदास वायगणकर यांचा समावेश आहे. डमी उमेदवारी अर्ज मिळून एकूण पंधरा अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी या अर्जाची छाननी केली जाणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी महादेव अरोंदेकर यांनी दिली आहे.

दक्षिण गोव्यात प्रचाराला जोरात सुरुवात झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नारळ भाजपचे नरेंद्र सावईकर यांनी फोडला होता. त्यानंतर एक एप्रिल रोजी निज गोयंकार फ्रंटचे उमेदवार डॉ. कालिदास वायंगणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे फ्रान्सिस सर्दीन आणि आपचे एल्विस गोम्स यांनी दोन एप्रिल रोजी एकाच वेळी शक्ती प्रदर्शन घडवून उमेदवारी भरली होती.

अपक्षांमधून मयूर खणकोणकर आणि शिवसेनेच्या राखी नाईक यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपजिल्हाधिकारी महादेव अरोंदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डमी अर्ज धरता दक्षिण गोव्यातून एकूण पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील वरील सहा हे मुख्य अर्ज आहेत. शुक्रवारी अर्जाची छाननी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.